मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- अनेक दिवसापासून पालकमंत्री नेमणूकची यादीही तात्कळत पडली होती. परंतु दोन-तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला होता.
त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पालकमंत्री नियुक्ती नवीन सुधारित यादी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली.
राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी अध्यादेश काढण्यात आला . या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी मान्य अद्याप मान्य करण्यात आली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे होते. त्यांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकचे पालकमंत्री पद विद्यमान शिवसेनेचे दादा भुसे आहेत. या जागेवर भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा दावा आहे. मात्र, दोघांच्या या दाव्यामध्ये भुजबळ आणि महाजन यांचा दावा पेंडिंग ठेवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या बाबतीत अद्याप तोडगा निघालेला नसल्याचे यावरुन दिसून येत आहे. या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केले होते. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. आज अखेर हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे. उर्वरित राहिलेली पालकमंत्री नेमणूक ही लवकरात लवकर केली जाईल.
सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:
पुणे – अजित पवार
अकोला – राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर – चंद्रकांत दादा पाटील
अमरावती – चंद्रकांत दादा पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
भंडारा – विजयकुमार गावित
बुलढाणा – दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
गोंदिया – धर्मरावबाबा आत्राम
बीड – धनंजय मुंडे
परभणी – संजय बनसोडे
नंदूरबार – अनिल भा. पाटील



