श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):-श्रीरामपूर शहरातील एका फुड कॅफेमध्ये अश्लिल चाळे करणार्या तीन युवक व तीन युवतींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या युवकांच्या असल्या उद्योगामुळे पालक वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याने त्यांना पोलिसांनीही समज देऊन सोडून दिले आहे. शहरातील बोरावके महाविद्यालयामागील रेल्वे लाईनच्या बाजूस असलेल्या एका फुड कॅफेमध्ये कॉलेज युवक युवती अश्लिल चाळे करीत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी शहर पोलिसांचे एक पथक नेमून सदर कॅफेवर छापा टाकून कारवाई करण्याचे आदेश पथकास दिले होते.
त्यानुसार पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड, रघुवीर कारखिले, राहुल नरवडे, गौतम लगड, सतिश खरात, रमिजराजा आताप, श्री. माळी, चालक श्री. गिरी, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता निकम-गुंजाळ, मिरा सरद यांनी समृध्दी फुड कॅफेवर छापा टाकला असता त्याठिकाणी पोलिसांना तीन युवक व तीन युवती अश्लिल चाळे करताना आढळून आले. पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. या सदरच्या युवक-युवतींवर प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी कॅफे चालक रोहित आबा शिंदे (वय 22, रा. श्रीरामपूर) याच्याविरुध्द मुंबई पोलीस अॅक्ट 110, 112 प्रमाणे कारवाई केली आहे.



