नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- अहिल्या नगर येथील बिरोबा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने नवरात्रात विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार असून नऊ दिवस चालणारा नवरात्र उत्सव ब्रह्मलीन गुरुवर्य किसनगिरी महाराज व ह भ प भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने व महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
यावेळी बिरोबा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले की रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता रांजणगाव देवी ते अहिल्यानगर ज्योतीचे आगमन होईल व सायंकाळी चार वाजता घटस्थापना करण्यात येईल. त्यानंतर सोमवार दिनांक 16 रोजी साडेसात वाजता प्रदीप राजगिरे यांचा मॅजिक शो व रात्री नऊ वाजता खास महिलांसाठी ट्रॅडिशनल शोचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी शिवशाहीर कल्याण काळे यांचा शिवचरित्रावर पोवाडा सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. बुधवार दिनांक 18 रोजी तरवडी येथील सोमेश्वर तरुण मंडळाच्या वतीने भारुडाचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक 19 रोजी डॉक्टर प्रशांत याकुंडी यांचा आरोग्य विषयक हा कार्यक्रम सायंकाळी 4 ते 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध विनोदी कथाकार संजय कळमकर यांचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी दिनांक 21 रोजी साडेसात वाजता विविध गुणदर्शन हा कार्यक्रम मुले व महिलांसाठी आयोजित करण्यात आहे.तसेच या संपूर्ण नवरात्र उत्सवात खास आकर्षण होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा महिलांसाठी चा कार्यक्रम रविवार दिनांक 22 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पल्लवी ज्वेलर्स, दहिवाळकर सराफ, श्री साई मंगल ज्वेलर्स यांच्यातर्फे विजेता महिला पैठणी देण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता होम हवन व त्यानंतर कालिका भजनी मंडळ अहमदनगर यांचा देवीचा जागर हा धार्मिक कार्यक्रम साडेसात वाजता होणार आहे. मंगळवारी दिनांक 24 रोजी रात्री आठ वाजता रावण दहन होणार आहे. त्यानंतर दिनांक 25 रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता ह भ प रामायणाचार्य ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी सहा वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येईल. तसेच या नवरात्र उत्सवाच्या काळात रविवार दिनांक 22 रोजी महंत स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज हे सकाळी 9 वाजता बिरोबा नवरात्र उत्सव समितीची सदिच्छा भेट देणार आहेत.
तसेच यावेळी बिरोबा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने नेवासा तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या नवरात्र उत्सवाचे विशेष खास आकर्षण म्हणजे दररोज रात्री ९:३० वाजता महिला दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. या दांडिया उत्सवात महिलांनी सहभाग नोंदवावा असेही आवाहन बिरोबा नवरात्रोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



