मुंबई ( जनता आवाज वृत्तसेवा ):- शिंदे गट शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे.
आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना नोटीस बजावली
आमदार अपात्रतेसंदर्भात आतापर्यंत निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न उपस्थित करत सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात या नोटीशीला उत्तर द्या, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. साधारण अडीच महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आली नाही. त्यामुळे नार्वेकर यासंदर्भात जाणून-बुजून विलंब करत असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे. ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील याचिका दाखल केली होती. यावर आज सु्प्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. येत्या दोन आठवड्यांत आपले उत्तर सादर करावे, अशी नोटीस सुप्रीम कोर्टाने नार्वेकर यांना बजावली आहे.



