spot_img
spot_img

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘आयुष’ रुग्णालयाचे उद्घाटन आयुर्वेदातील आधुनिक पद्धतीने रुग्णांवर होणार उपचार

अहमदनगर( जनता आवाज वृत्तसेवा) :-नगर शहराच्या वैभवात भर टाकणारे आणि गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या नगर येथील (तारकपूर) आयुष रुग्णालयाचे काल गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी येथून दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. तसेच प्रस्तावित महिला व बालरुग्णालयाचे भूमिपूजन देखील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतला.

भारतीय प्राचीन उपचार पद्धती असलेल्या या रुग्णालयात पंचकर्म, योगा, ध्यानधारणेसोबतच युनानी पद्धतीने रुग्णांवर उपचार होणार आहेत. नगर लोकसभेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हे नऊ कोटी खर्च करून ३० बेडचे आयुष रुग्णालय साकारले आहे.

३३ हजार चौरस फुटांवर या रुग्णालयाची इमारत तयार झाली असून एकूण ३० बेडच्या या रुग्णालयात आयुर्वेद, होमिओपॅथी, योगा, युनानी, सिद्ध यांसारख्या पॅथींद्वारे

उपचार केले जातील. विशेष म्हणजे आयुर्वेदातील आधुनिक पद्धतींचा वापर करून रुग्ण लवकरात लवकर बरा होण्याचे काम येथील तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत. या ठिकाणी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष मिशन कार्यक्रमांतर्गत दुर्धर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांना योग्य उपचार घेता येणार आहेत, विशेष म्हणजे या रुग्णालयात योगासाठी मोठा हॉल देखील उपलब्ध करण्यात आला आहे.

तसेच कॅन्सर, सांधेवात, त्वचारोग, टॉन्सिलचे आजार आणि किडनी विकारांवरही येथे उपचार मिळतील. तज्ज्ञ डॉक्टर व आयुर्वेदातील आधुनिक उपचार पद्धती हे आयुष रुग्णालयाचे वैशिष्ट्ये आहे.

या रुग्णालयात आवश्यक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली असून हे रुग्णालय आता रुग्णांच्या सेवेत सज्ज झाले आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज सुमारे १२०० रुग्ण तपासणीसाठी येतात तर सुमारे ४५० रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतात. या रुग्णांपैकी शेकडो रुग्णांवर आयुष रुग्णालयात आयुर्वेदिक पद्धतीने उपचार होणार आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची संख्या कमी होण्यास आयुषचा मोठा हातभार लागणार आहे. एकूणच आरोग्याच्या बाबतीत नागरिकांना सर्व सोयी सुविधा या जिल्ह्यातच उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने ही अतिशय दिलासादायक बाब आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!