आश्वी दि.२८( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामकाजासाठी शासन आणि विद्यापीठ सदैव प्रयत्नशील असते. चांगल्या दर्जाचे शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून विविध उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येतात. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा असते. अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांमुळेच दर्जेदार शिक्षण मिळते. असे मत एस. एम. अल्हाट यांनी आरक्षण कक्षच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीच्या विविध संधी या विशेष मार्गदर्शन व्याख्यानाच्या निमित्ताने मांडले.
आश्वी येथील कला,विज्ञान,वाणिज्य आणि संगणक महाविद्यालयात विद्यार्थ्यासाठी असलेल्या शासनाच्या आणि विद्यापीठाच्या विविध शिष्यवृत्तीच्या योजनाचा परिचय व्हावा व लाभ घेता यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आरक्षण कक्ष सेलच्या अंतर्गत करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. देविदास दाभाडे होते. समवेत प्रा. विवेक डोखे, प्राचार्या डॉ. सुवर्णा जाधव, प्रा. शेखर ब्राह्मणे, श्री. मोहम्मद सय्यद, श्री. सोपान पुंड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी विवेक डोखे यांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे कशी व कोणत्या कार्यालयातून मिळवायची यावर मार्गदर्शन केले तसेच शासनाच्या विविध डिजिटल सुविधांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. पुढे बोलताना श्री. अल्हाट म्हणाले की, शासनाच्या शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक ती कागदपत्रे वेळेत जमा केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येतोच. शैक्षणिक कामकाजासाठी शिष्यवृत्ती हातभार लावते त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लतीफ शेख यांनी केले होते सूत्रसंचालन डॉ. सारीका थेटे यांनी केले तर आभार आरक्षण कक्षाचे समन्वयक प्रा. शेखर ब्राम्हणे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 631585