श्रीरामपूर दि.१६( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारत विकास यात्रेच्या माध्यामातून सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लोकापर्यत पोहचण्याची मोठी संधी ग्रामपंचायत सदस्यांना आहे. विकासासाठी निधीची कमतरता नाही फक्त काम करण्याची ईच्छाशक्ती ठेवण्याचे आवाहन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
फत्याबाद येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार तसेच पांडूरंग आठरे यांचा अभिष्टचितन सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे इंद्रभान थोरात नानासाहेब शिंदे शरद नवले अभिजीत खंडागळे नूतन सरपंच ज्ञानेश्वरी आठरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे.गावाच्या विकासाचे निर्णय करण्यासाठी मोठ्या संधी आहेत.कारण लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभरहून अधिक योजना सुरू आहेत.या योजना लोकांपर्यत घेवून जाण्याची जबाबदारी गावाचे कारभारी म्हणून नविन सदस्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन करून मंत्री विखे पाटील म्हणाले की समाजातील शेवटचा घटक विकास प्रकरीयेत यावा हाच प्रत्येक योजनेचा उद्देश आहे.सलग ८० टक्के लोकांना २०२९ पर्यत मोफत धान्य देण्याच्या योजना असेल किंवा आता आयुष्यमान भारत योजनेची सुरू झालेली कार्यवाही महत्वपूर्ण असल्याचे विखे पाटील म्हणाले.
राज्य सरकारने एक रुपयात पीक विमा योजना सुरू करून संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहाण्याची भूमिका घेतली.आज नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असून दरवाढ कशी करता येईल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून सोमवारच्या बैठकीत त्यादृष्टीने निश्चीत निर्णय होईल आशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतशिवार पानंद रस्त्याच्या कामांना प्रशासनाने अधिक गती देण्याची आवश्यकता असल्याचे विखे पाटील म्हणाले.निवडणूक आता झाली आहे.गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत या विकसाला निश्चित सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दिपक पठारे इंद्रभान थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.



