नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा फाटा येथील कॉलेज परिसरामध्ये संघर्ष शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान च्या बालगोपाळांनी हुबेहूब रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली असून त्यांच्या या कलाकृतीचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
दिवाळीत बच्चे कंपनीसाठी कपडे, फटाकडे ,फराळ याची लगबग सुरू असते. तसेच विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्तशाळेची सुट्टी लागली की बच्चे कंपनीच्या डोक्यात किल्ला बनवण्याचे चक्र चालू होते. अशातच संघर्ष शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान च्या बालगोपाळांचा उत्साह द्विगुणित होऊन त्यांनी हुबेहूब व आकर्षक रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली. दिवाळीत मातीचा किल्ला बनविणे हे शुभ मानले जाते यावेळी हा मातीचा किल्ला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी झाली आहे. या बालगोपाळांचे सर्व स्तरातून कौतुकही करण्यात येत आहे. माती पासून बनवलेल्या या किल्ल्याची पूजा करण्यात आली तसेच किल्ल्यावर आकर्षक सजावट करण्यात आली. किल्ल्याच्या ठिकाणी हुबेहूब मावळे पहारा देताना दिसत आहेत. रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती या प्रदर्शनातून शिवप्रेमींना पहावयास मिळाली.
याप्रसंगी किल्ला बनवण्या कामी संघर्ष शिवप्रेमी युवा प्रतिष्ठानचे ओम केशव पेहेरे, ओम राहिले, भार्गव पेहेरे ,ओम म्हस्के ,शिव भणगे, ओम जमधडे, गौरव पंडित या मुलांनी परिश्रम घेतले.



