नगर दि. १६ ( जनता आवाज वृत्तसेवा):-दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची आहे.मात्र दर निश्चित करण्यात आलेल्या समितीच्या अहवालानूसार अमंलबजावणी होत नसल्याने दरवाढीच्या निर्णया करीता सोमवारी बैठक बोलाविण्यात आली असल्याची माहीती महसूल व पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत नगर सोलापूर येथून आलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यां विखे पाटील यांनी जाणून घेतल्या.भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग अतिरीक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर निवासी उपजिल्ह्धिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्यांच्या समस्या जाणून घेतल्या.यामध्ये ३४ रुपये दर निश्चित करण्यात आल्या नंतर दूध संघ चालकांनी फॅटची कारण सांगून दर कमी करायला सुरूवात केली.आज चार्याचे आणि पशुखाद्याचे वाढलेले भाव यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याची बाब या बैठकीत शेतकऱ्यांनी मांडली.राज्यात दूधमूल्य आयोग स्थापन करावा,पशुखाद्याचे भाव नियंत्रित करणारी संस्था निर्माण करावी दूधाची खरेदी आॅनलाईन व्हावी तसेच भेसळ रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्र्याकडे केली.
यासर्व प्रश्नाबबात सरकार सकारात्मक असून काही गोष्टीवर अंमलबजावणी देखील सुरू केल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,सर्वाच्या मान्यतेने ३४ रुपये दर निश्चित करण्यात आला होता.पशुखाद्याचे दर कमी करण्याचा आग्रह सरकराचा आहे.पण कंपन्याकडून मका महाग झाल्याची कारण सांगण्यात येत असल्याने यातील मध्य कसा काढायचा याबबात सरकार गांभीर्याने विचार करीत असून,सरकारच्या भूमिकेमुळे आता कंपन्यांनी खाद्यामध्ये असलेल्या घटकांची माहीती गोण्यांवर छापणे सुरू केले आहे.
राज्य सरकारची भूमिका दूध उत्पादकांना न्याय देण्याची असून,दर वाढीचा विषय मोठा असला तरी यामध्ये कसा मार्ग काढायचा हा प्रयत्न निश्चित करणार असल्याची ग्वाही देवून राज्यातील पशुधनाला विमा संरक्षण देण्याचा निर्णयही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
दूध भेसळ रोखण्यासाठी सरकारने जिल्हा स्तरावर नेमलेल्या समितीकडून काम सुरू असले तरी कारवाईची गती वाढली पाहीजे.नगर जिल्ह्यात बारा हजार लिटर दूध नष्ट करण्यात आले असून ४०खटले दाखल करण्यात आले असल्याची माहीती त्यांनी दिली.
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून दर वाढ निश्चित करण्यासाठी सोमवारी संघटना आणि दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक बोलाविण्याचा निर्णय मंत्री विखे पाटील यांनी घेतला.



