आश्वी दि.१८( जनता आवाज वृत्तसेवा ):-आज आपल्या ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसाय आणि कुटुंब व्यवस्थित चालवत आहे. आजची युवती एकाच वेळी अनेकांगी भूमिका बजावत आहे याचे श्रेय खऱ्या अर्थाने जाते ते प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला आश्वी सारख्या ठिकाणी उच्च शिक्षणाची सुविधा संस्थेमार्फत प्राप्त झाली आणि परिसरातील मुलीना शिक्षणाची, आर्थिक साक्षरतेची, सर्वांगीण विकासाची संधी मिळाली. असे प्रतिपादन कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आश्वी खुर्द मध्ये माजी विद्यार्थी परिषद आयोजित माजी विद्यार्थिनी मेळावा प्रसंगी माजी विद्यार्थिनी प्रा. शितल दिवे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक अण्णासाहेब भोसले पाटील होते. प्रमुख अतिथी प्रा. शितल दिवे समवेत रामभाऊ पाटील भुसाळ, भाऊसाहेब जऱ्हाड, आश्वी खुर्द ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. अलकाताई गायकवाड , रविकिरण गायकवाड पाटील, सौ उषाताई गायकवाड , संस्थेचे उच्च व अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे ,डॉ. महेश खर्डे माजी विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष दीपक सोनवणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुवर्णा जाधव उपप्राचार्य प्रा. देवीदास दाभाडे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते विद्यार्थी हिताच्या योजना राबवितांना सर्व घटकांचा विचार महाविद्यालय नेहमीच करत आले आहे. यंदाच्या दिवाळीत माजी विद्यार्थिनीचा मेळावा आयोजित करून महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीना एकत्र येण्याची व जुन्या आठवणीना उजाळा देण्याची संधी प्राप्त करून दिली. महाविद्यालयाची स्थापना २००१साली झाली तेव्हापासून २०२२ पर्यंतच्या म्हणजेच २२ वर्षातील अनेक माजी विद्यार्थिनी यावेळी एकत्र आल्या होत्या.
या प्रसंगी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्राची पाबळ आणि शितल थोरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना प्रा. दिवे म्हणाल्या की, मुल्यधिष्ठीत शिक्षण प्रवरेतून मिळत आहे याचाच परिपाक म्हणजे आमच्यासारख्या ग्रामीण भागातील सायकल चालवायला घाबरणाऱ्या मुली आज मुंबई सारख्या शहरात कार चालवू शकलो. महिला सक्षमिकरणात जनसेवा फौंडेशन च्या मदतीने राबविण्यात येणारे उपक्रम खरच फायदेशीर ठरत आहे. आदर्श महिला घडविण्याचे काम आश्वी महाविद्यालय आणि प्रवरा शिक्षण संस्था करत आहे. याचबरोबर अण्णासाहेब भोसले पाटील व डॉ. प्रदीप दिघे यांनीही यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुवर्णा जाधव यांनी केले सूत्रसंचलन प्रा. प्राजक्ता खळदकर व प्रा. नीतू मांढरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा. सुनंदा पाचोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. सारिका थेटे, प्रा. योगिता तळेकर, प्रा.दिपाली तांबे आदींनी मेहनत घेतली. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




Total Users : 630381