राहाता,दि.२०( जनता आवाज वृत्तसेवा ):-संगमनेर आणि संजीवनीने गणेश परिसरातील ऊस लुटून नेला तेव्हा बघ्याची भूमिका का घेतली? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र लहारे यांनी केला आहे. कारखान्यातील ‘सरपण’ ज्यांना पुरले नाही त्यांच्या कौतुकाचे गोडवे गाण्यापेक्षा गणेश कारखान्यात गुंवणूक करण्याचा आग्रह थोरात आणि कोल्हेंकडे धरावा असे आव्हान त्यांनी गणेश कारखान्याच्या पदाधिकार्याना दिले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात लहारे यांनी म्हटले आहे की, गणेश कारखाना बंद पडल्यानंतर या भागातील ऊस संगमनेर आणि संजीवनीने अक्षरश: लुटून नेला तेव्हा आपल्या नेत्यांना गणेश कारखान्याची काळजी वाटली नाही.तुम्ही सुध्दा बघत राहीलात. तुमच्या नेत्यांच्या कार्यकर्तृत्वा मुळेच बंद पडलेल्या गणेश कारखान्यातील कामगार आणि ऊस उत्पादकांची कशी वाताहत झाली, कारखान्यावर ७५ कोटींहून अधिक रक्कमेचे कर्ज करुन, कारखाना तोट्यात कोणी घातला? कामगारांच्या ४२ महिन्यांच्या पगाराचे काय झाले? काळाकुट्ट आंधार ज्यांनी गणेश कारखान्याच्या नशिबी आणला याचे दु :ख सुज्ञ सभासदांना आणि कामगारांना अजूनही असल्याने आनंद देत असल्याची तुमच्या नेत्यांची वक्तव्य म्हणजे “बडा घर पोकळ वासा” असल्याचा टोला लहारे यांनी लगावला.
बंद पडलेला कारखाना कोल्हे पॅटर्नने तुमचे नेते सुरु करु शकले असते, परंतू कारखाना पुन्हा सुरु व्हावा ही इच्छाच नव्हती. उलट कोल्हे पॅटर्न सभासदांच्या माथी मारून सभासदांना दोन वर्षे भाव कमी घ्यायला लावला.कामगारांना २० टक्के पगार कमी दिले आणि कारखाना बंद पाडल्यानंतर मशिनरी खोलून कोणी नेले याचा सोयीस्कर विसर तुम्हाला आता पडला असल्याचे लहारे म्हणाले.
कारखाना सुरू होण्यापेक्षाही कार्यक्षेत्रातील ऊसावर संगमनेर आणि संजीवनीचा अधिक डोळा होता. त्यामुळे गणेश कारखान्यावरील तुमच्या नेत्यांचे बेगडी प्रेम उघड झाले. आज तुमच्या नेत्यांनी गणेश कारखान्याच्या बाबतीत कळवळा दाखविण्यास केलेली सुरुवात ही सभासदांच्या डोळ्यात धुळफेकच असल्याची टिका करून, संगमनेर आणि संजीवनीच्या नेत्यांच्या कौतुकाचे गोडवे तुम्ही गात असला तरी, त्यांनी कारखाना चालविण्यासाठी स्वत:ची किती गुंतवणूक केली याचे आकडे एकदा जाहीर करा असे आवाहन लहारे यांनी दिले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २३ कोटी रुपयांची गुंतवणूक करून कारखाना अद्यावत केला.करारात नसतानाही १हजार निवृत कामगारांना ११कोटी रुपयांची देणी अदा केली. विखेंच्या मार्गदर्शनाखाली आठ वर्षे गणेश कारखाना यशस्वीपणे सुरु राहीला. आधूनिकीकरण करुन गाळप क्षमताही ३ हजार टनापर्यंत नेली. मागील वर्षी गाळपास आलेल्या ऊसाला प्रवरे प्रमाणे भाव दिला. सुस्थितीत कारखाना आल्यानेच संगमनेर आणि कोपरगावचे नेते कारखाना चालविण्यासाठी पुढे सरसावले आहेत.परंतू संचालक मंडळाच्या निवडणूकीत मिळालेल्या विजयाने फार हुरळून जावू नका. कारण २०११-१२ या तुमच्या नेत्यांच्या कार्यकाळातील फरकाचे पेमेंट २कोटी रुपये अद्यापही ऊस उत्पादकांना मिळालेले नाहीत आठवण लहारे यांनी पत्रकात करून दिली आहे.
स्वताचे कारखाने सुरक्षित ठेवून कर्जमुक्त झालेला गणेश कारखाना पुन्हा कर्जाच्या खाईत लोटण्याचे काम संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यातील संस्थेच्या मदतीने सुरू केले हे अत्यंत दुर्दैवी असून, या कर्जाचा भार पुन्हा एकदा सभासदांच्याच माथी तुम्ही मारणार का? नेत्यांच्या इशा-यावर मंत्री विखे पाटील यांच्यावर टिका करण्यापेक्षा आपल्या नेत्यांकडे कारखान्यात गुंतवणूक करण्याचा आग्रह धरावा. यापुर्वी कारखान्यातील सावळ्या गोंधळाचे फासे कोणाच्या गळ्यात कसे अडकलेले आहेत, यातून वाचण्यासाठी मंत्री विखे पाटील यांचे कोणी पाय धरले हे उघड करण्यास भाग पाडू नका असा इशाराही त्यांनी शेवटी पत्रकातून दिला आहे.



