लोणी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-विद्यार्थ्यांच्या सुप्त व उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कूलने दिवाळीच्या सुट्टीचे औचित्य साधून “किल्ले बनवा व आपला ऐतिहासिक वारसा जपा” हा एक अभिनव उपक्रम राबविला.विद्यार्थ्यांसाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ले बनवा ही स्पर्धा आयोजित करावी, ही अनोखी कल्पना शाळेचे प्राचार्य डाॅ. बी बी अंबाडे यांनी सर्व शिक्षकांसमोर मांडली.
वर्गशिक्षकांनी त्यांच्या वर्गाच्या ग्रुपवर सदर स्पर्धेची माहिती दिली.सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी घरच्या घरी आदर्श अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या व त्यांचे फोटो शाळेच्या ग्रुपवर पाठविले.या स्पर्धेमध्ये जवळपास २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी या गटातील विद्यार्थ्यांसाठी घेतली गेली.सर्व स्पर्धकांमधून उत्कृष्ट किल्ले बनवणारे तीन विद्यार्थी बक्षीसाचे मानकरी ठरले.
या सर्व सहभागी व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सीईओ डाॅ.सुश्मिता विखे,शिक्षण संचालिका सौ.लीलावती सरोदे व इतर मान्यवरांनी विशेष कौतुक केले.शाळेचे प्राचार्य डाॅ. बी.बी अंबाडे,उपप्राचार्य श्री.के.टी अडसूळ,सौ एम.एस जगधने तसेच कलाशिक्षक श्री.एस.टी तुपे व श्री.भगत यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले व मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकांनी शाळेचे व प्राचार्यांचे विशेष अभिनंदन केले.
प्रवरेच्या शैक्षणिक संकुलातील मुलांना आपल्या इतीहासांची ओळख व्हावी या उद्देशाने संस्थेच्या डाॅ.सुष्मिताताई विखे यांनी यावर्षीची संकल्पना ही महाराष्ट्राचे दुर्ग वैभव गाथा उज्ज्वल इतिहासाची असल्याचे सांगून याद्वारे गड किल्ले आणि त्याचा इतिहास विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले असून याव्दारे मुलांच्या कलेला देखिल व्यासपीठ मिळाले आहे.



