लोणी,दि.१( जनता आवाज वृत्तसेवा ):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली विकसीत भारत संकल्प यात्रा ही लोककल्याणकारी योजनांच्या प्रबोधनासाठी उपयुक्त ठरेल. या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गावपातळीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही सक्रीयपणे प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
विकसीत भारत संकल्प यात्रेचा राहाता तालुक्यातील शुभारंभ सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी गटविकास आधिकारी जालिंदर पठारे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, तालुका आरोग्य आधिकारी डॉ.संजय घोलप, भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.कांचनताई मांढरे, सरपंच कल्पना मैड, माजी उपसरपंच अनिल विखे, जेष्ठनेते किसनराव विखे, माजी सिनेट सदस्य अनिल विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, भाऊसाहेब तुकाराम विखे, चेअरमन अशोकराव धावणे आदि उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ.विखे पाटील म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शंभरहून अधिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. या योजनांमध्ये सातत्य राखले गेल्यामुळेच योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळत आहे. नऊ वर्षांच्या कार्यकाळाचे हे मोठे यश असून, या योजनांमधून जे लाभार्थी वंचित राहीले आहे त्यांच्यासाठी या यात्रेच्या माध्यमातून पुन्हा एकदा योजनांची माहीती गावपातळीवर सहजपणे मिळू शकेल.
ही यात्रा गावागावात जाणार असून, या निमित्ताने सरपंच आणि सदस्यांनी गावातील नागरीकांना योजनांची माहीती, तसेच योजनांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावावी. लोककल्याणकारी योजना या सर्वांसाठीच असल्यामुळेचत्याचा लाभ प्रत्येक नागरीकाला मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गटविकास आधिकारी जालिंदर पठारे यांनी यात्रेबाबतची माहीती उपस्थितांना दिली. या यात्रेच्या निमित्ताने महिला बचत गट, आरोग्य विभाग, पोस्ट कार्यालय, कृषि विभाग यांचे दालनही उभारण्यात आले होते. या माध्यमातून योजनांची माहीती उपस्थितांना दिली गेली. आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही सौ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.