कोल्हार ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- कोल्हार भगवतीपूर शिवारात रानशेंडा – कडसकर वस्ती येथे काल सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पेरूच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका युवकावर हल्ला केला. यामध्ये युवक गंभीर जखमी झाला असून त्यास रात्री खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
स्वप्निल कचेश्वर कडसकर ( वय ३२) रा. कडसकर वस्ती, भगवतीपूर असे जखमी युवकाचे नाव आहे. ते आपल्या दुचाकीवरून रात्री घराकडे रस्त्याने जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. अचानक रस्त्याच्या बाजूने बिबट्याने येऊन त्यांच्यावर झडत घातली. यामुळे ते प्रचंड घाबरले. गाडी सोडून ते तसेच पाठीमागे मोठ्याने ओरडत पळाले. आजूबाजूच्या वस्तीवर असलेल्या २० – २२ जणांनी त्यांच्याकडे तात्काळ धाव घेतली. या सर्वांनी मिळून मोठ्याने आवाज करीत दगड – गोटे फेकत बिबट्याला पळवून लावले.जमाव पाहून बिबट्याने तेथून धूम ठोकली. जखमी अवस्थेतील स्वप्निल कडसकर यास रात्री उशिरा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
गेल्या कित्येक महिन्यांपासून या परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. येथे स्थानिक रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या ६ – ७ महिन्यांपासून वन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली. मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. नागपूर तथा नाशिक येथे जाऊन पिंजरा लावण्यासाठी परवानगी घ्याव्या लागतील. अशी उडवा उडवी ची उत्तरे देऊन पिंजरा लावण्याकामी टाळाटाळ करण्यात आल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
अशाप्रकारे बिबट्याचे हल्ले माणसांवर होऊ लागले तर करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या हल्ल्यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या भागात तात्काळ पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अन्यथा वन अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा येथील स्थानिक रहिवाशांनी दिला आहे.