लोणी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर येथे सुरू असलेल्या नमो संस्कृती महोत्सवात शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्त प्रवरेचे संभवामी युगे युगे हे महानाट्य सादर करण्यात आले. लोकनेते डॉ.पद्यभुषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयाने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील आणि शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रवरेच्या शाळा आणि महाविद्यालयांतील पाचशे विद्यार्थी व पन्नास पेक्षा अधिक शिक्षक व कर्मचारी यांसोबत प्रवरेच्या अश्व शाळेतील घोड्यांचाही सहभाग होता. दोन तास चाललेल्या या महानाट्यामध्ये शिवजन्म पूर्व काळापासून सुरुवात करून शिवराज्याभिषेकापर्यंत घडलेल्या सर्व प्रसंगांचे यथोचित दर्शन घडवण्यात आले. न भुतो न भविष्यती अशा या कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि सर्व कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. लीलावती सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. गिरीश सोनार, प्राचार्या भारती देशमुख, प्रा. अंकुश सूर्यवंशी, प्रा. राहुल हिंगे, सौ. अनिता नळे, श्री. राजेश माघाडे, श्री. सुनील ब्राह्मणे यांच्या समन्वय समितीसोबत संहिता लेखन, सांस्कृतिक, संगीत, व्हॉईस ओव्हर, कला, तांत्रिक, वाहतूक इ. समितीतील सदस्यांनी, सहयोगी कर्मचाऱ्यांनी व प्रवरेच्या विद्यार्थ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.
या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.