कोल्हार ( वार्ताहर ) :- गेल्या वर्षभरापासून श्रीरामपूर तालुक्यातील कडीत बुद्रुक या गावातून शेतकऱ्यांच्या शेळ्या चोरी जात असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांनी याचा तातडीने शोध घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कडीत बुद्रुक येथील वेणुनाथ कल्याण गुजर या शेतकऱ्याने दैनिक सार्वमतशी बोलताना सांगितले, एक – दोन दिवसापूर्वी त्यांच्या घराजवळ गोठ्यात बांधलेल्या दोन शेळ्या मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेल्या. यासंदर्भात त्यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तीन महिन्यापूर्वी त्यांच्याच मालकीचे शेळीचे बकरू चोरीला गेले. याशिवाय तीन – चार महिन्यापूर्वी त्यांचे बंधू पांडुरंग कल्याण गुजर यांची शेळी चोरीला गेली. तीन महिन्यांपूर्वी कडीत बुद्रुक येथील सुनील शिवाजी होन यांच्या घरासमोरून रात्रीच्या वेळी बोकड चोरुन नेत असताना त्यांनी स्वतः पाहिला, त्यांनी आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. एक महिन्यापूर्वी येथील अशोक बन्सी मेनगर यांची शेळी चोरीला गेली. वर्षभरामध्ये कडीत बुद्रुक गावातून आठ ते दहा शेळ्या चोरीला गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात लोणी पोलिसांनी तातडीने चौकशी करावी. पशुधन चोरीला जात असल्याचा घटनांना पायबंद बसावा याकरिता चोरट्यांना कडक शासन करावे अशी मागणी वेणुनाथ गुजर यांनी केली आहे.




