श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-भंडारदरा लाभक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची पिके हातचे जाऊन झालेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीचे आवर्तन तात्काळ सुरु करण्याची मागणी जिल्हा बँकेचे संचालक मा.उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केली आहे.
ससाणे पुढे म्हणाले की श्रीरामपूर तालुक्यातील भंडारदरा लाभक्षेत्रामधील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. तसेच भूजल पातळी अपेक्षित रित्या वाढलेली नसल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झालेला आहे. एकीकडे मोठा पाऊस पडतो आहे तर दुसरीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत उपलब्ध पाण्यावर बियाणे, खते व मेहनतीसाठी खर्च करून सोयाबीन, मका,ऊस, कपाशी, भाजीपाला व पशुधनासाठी लागणारा चारा ही पिके मोठ्या मेहनतीने जगवली आहेत. परंतु पाण्याअभावी ही पिके सुकत असून चालू हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी चिंतातूर आहे.
भंडारदरा पानलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण सध्या भरलेले आहे. धरणात मुबलक पाणी आहे. परंतु तालुक्यातील बंधारे, तलाव अद्यापही कोरडे ठाक आहेत. त्यामुळे शेतीसाठीचे आवर्तन सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतीसाठी वेळेवर आवर्तन सुरू केल्यास शेतकऱ्यांची हातचे जाणारी पिके वाचणार आहेत. शेतकरी बांधव सध्या पाण्याअभावी मोठ्या अडचणीत असून कालवा प्रशासनाने शेतीचे आवर्तन तात्काळ सुरू न केल्यास श्रीरामपूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही ससाणे यांनी दिला आहे.