श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे निधीत आवड-निवड करतात, अडचणी निर्माण करतात, असा माजी आ.भानुदास मुरकुटे यांचा आरोप हा धांदात खोटा आहे. उलट पालकमंत्री झाल्यापासून ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरसाठी कोट्यावधी रूपयांची कामे मार्गी लावली. यामुळे मंत्री विखे यांची श्रीरामपुरात लोकप्रियता वाढत आहे. याचा पोटशूळ मुरकुटे यांना उठला आहे, अशा शब्दात मुरकुटे यांच्या टीकेला भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी उत्तर दिले आहे.
दिपक पटारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ‘वर तंगडी’ करणे ही मुरकुटे यांची निती आहे. कारण बाजार समिती, मुळा प्रवरा, जिल्हा बँक, अशोक कारखाना, नगरपालिका अशा निवडणुका आल्या की स्वार्थासाठी मुरकुटे हे विखे, थोरात, आदिक, ससाणे यांच्याशी युती करतात आणि कार्यभार उरकला की उलटतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. जनतेची दिशाभूल करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. श्रीरामपूर तालुक्यासाठी एकही मोठे विकासाचे काम न करणारे आणि विकासप्रक्रियेत अडथळा निर्माण करणार्या मुरकुटे यांनी फक्त राजकीय भांडण लावायचे आणि स्वतःची पोळी भाजायची, हेच उद्योग गेली 40 वर्षे केले आहे.
याउलट श्रीरामपूर नगरपालिकेला 180 कोटींची सुधारित पाणीपुरवठा योजना, बेलापूर, ऐनतपूर गावासाठी 126 कोटींची तसेच दत्तनगरसह इतर गावांनाही कोटयावधीची योजना असे एकूण जलजीवन मिशन अंतर्गत पालकमंत्री झाल्यानंतर विखे पाटील यांनी सुमारे 500 कोटी रूपयांचा निधी तालुक्याला उपलब्ध करून दिला.
खंडकर्यांना जमिनी मिळवून दिल्या. अकारीपडीतचा प्रश्न मार्गी लावला. खंडकर्यांच्या जमिनी मोफत वर्ग-2 च्या वर्ग -1 करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय श्रीरामपूर शहरातील झोपडपट्टी वासियांना घरकुलांसाठी 28 एकर मोफत जागा दिली. पालिकेच्या इमारतीसाठी 5 एकर मोफत जागा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकात बसवण्यासाठी सर्व परवानग्या मिळवून त्यासाठी कोटयावधी रूपयांचा निधीही उपलब्ध करून दिला.
श्रीरामपुरात सहाय्यक नगररचना कार्यालय आणले. एवढेच नव्हेतर नुकताच श्रीरामपूर एमआयडीसीत 540 कोटींचा प्रकल्पाचे भूमिपूजन होवून या प्रकल्पातून हजारो तरूणांना रोजगार मिळणार आहे. या सर्व कामांमुळे मंत्री विखे पाटील यांच्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यात झपाट्याने लोकप्रियता वाढत आहे. त्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत आहे, याचा पोटशूळ मुरकुटे यांना उठला आहे.
कारण मंत्री विखेंनी एवढी कामे केल्यावर आणि त्यांची लोकप्रियता वाढल्यावर आपल्याला कोण विचारील? या भितीपोटी मुरकुटे हे पालकमंत्री विखेंवर बेताल आरोप करत आहेत. मात्र, राजकारणासाठी खोटे आरोप करणार्या मुरकुटे यांनी त्यांचा पक्ष कोणता आहे? हे पहिल जाहीर करावे. कारण काँग्रेसच्या लोकांबरोबर मांडीला माडी लावून बसत युतीच्या पालकमंत्र्यावर टीका करायची आणि अशोक कारखान्याला मार्जिन मनी मिळण्यासाठी मात्र महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना भेटायचे, त्यांची मदत कारखान्याला घ्यायची, हा दोगलेपणा मुरकुटे यांनी बंद करावा अन्यथा श्रीरामपूरची जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा दिपक पटारे यांनी दिला आहे.
..तर मग जादा ऊस उभा कसा?
मुरकुटे यांनी आयुष्यभर पाणी प्रश्नाचे राजकारण केले. श्रीरामपूरला मिळणार्या पाण्यातून वर शेती फुलवतात, आपल्यावर अन्याय करतात असे मुरकुटे सांगतात. जर वरचे लोक अन्याय करत असते आणि खाली कमी पाणी येत असते तर अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जादा ऊस कसाकाय उभा राहतो? अशोक कारखान्याला लागतो तेवढया उसापेक्षा जादा ऊस कार्यक्षेत्रात पिकतो. उलट बाहेरच्या कारखान्याला अशोकच्या कार्यक्षेत्रातून ऊस दिला जातो. जर पाणी कमी येत असते तर जादा ऊस पिकला असता का? असा सवाल पटारे यांनी उपस्थित केला आहे.
‘समजदारी’ची भाषा
मुरकुटेंच्या तोंडी?
पालकमंत्र्यांनी पालकाची भूमिका राबवायची असते. पालकमंत्री हा समजदार हवा, असे मुरकुटे म्हणतात हाच सर्वात मोठा विनोद आहे. कारण मुरकुटे आणि समजदारपणा या दोन टोकाच्या दोन गोष्टी आहेत, हे अख्या तालुक्याने गेली 40 वर्षे पाहीले आहे. त्यामुळे मुरकुटेंच्या तोंडी समजदारीची भाषा शोभत नाही, असे पटारे यांनी म्हटले आहे. उलट जिल्हयाला ना.राधाकृष्ण विखे यांच्या रूपाने पहिल्यांदाच अत्यंत समजदार आणि गोरगरीबांचे प्रश्न जाणून घेवून त्यांची सोडवणूक करणारा पालकमंत्री भेटल्याचे त्यांच्या अनेक ऐतिहासिक निर्णयातून स्पष्ट होते.