लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य करतांना पालकांचे स्वप्न पूर्ण करा, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. शिक्षणासाठी प्रवरा परिवार कायमच विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांनी दिला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजीनियरिंग (पॉलीटेक्निक)च्या प्रथम वर्ष विद्यार्थी, पालक शिक्षक तसेच पॉलिटेक्निकच्या ४३ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सौ. शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के, दत्ता पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. व्ही. आर.राठी,प्रवरा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सौ. विखे पाटील म्हणाल्या, प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच संस्कारही दिले जातात त्याचबरोबर मुलांच्या कलागुणांनाही संधी दिली जाते. मुलींच्या शिक्षणात प्रवरा शैक्षणिक संस्था अव्वल स्थानावर राहिली आहे. मुलींच्या सुरक्षेला प्रवरा शैक्षणिक संकुलाने कायमच प्राधान्य दिले असल्याने या भागात शहरी भागातील मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी शेतकऱ्यांची मुलं ही उच्च शिक्षित व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून स्थापन केलेली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आज खऱ्या अर्थाने उच्च स्थानावर पोहचली असल्याचे त्यांनी सांगितले.
आज प्रवरेचे अनेक विद्यार्थी जागतिक पातळीवर पोहोचले आहेत के.जी टू पी.जी शिक्षण देत असतानाच या शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम प्रवरेच्या माध्यमातून होत आहे.आपण निश्चिंत रहा. आपल्या विद्यार्थ्याची जबादारी आता आमची आहे असे सांगून विखे पाटील परिवार हा नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.
प्रारंभी प्राचार्य डॉ. व्ही आर. राठी यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत असताना ४३ वर्षांमध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडवले. या माध्यमातून महाविद्यालयाला देखील मोठी नवीन तंत्रज्ञान आणि नोकरी उपलब्ध करण्यामध्ये या माजी विद्यार्थ्यांचा फायदा झाला आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तांत्रिक शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या उपक्रमातून एक सक्षम युवा पिढी आणि एक सक्षम विद्यार्थी घडवण्याचं काम या महाविद्यालयाच्या माध्यमातून होत आहे असे सांगितले. यावेळी पालक प्रतिनिधी सौ गीता परदेशी, बापूसाहेब तनपुरे, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रवींद्र काकडे यांनी तर आभार प्रा. डी. व्ही. पठारे यांनी मानले.