श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-ईश्वरास प्राप्त करुन देण्याचे साधन म्हणजे ‘धर्म’ होय. प्रत्येक हिंदूंनी धर्मासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी उपस्थित हिंदू बांधवांना केले.
श्रीक्षेत्र सरला बेटचे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ तसेच बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील श्रीराम मंदिर चौक येथे समस्त वारकरी सांप्रदाय, हिंदु रक्षा कृती समिती, श्रीरामपूर यांच्या वतीने धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील हिंदु समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रसंगी कालीचरण महाराज उपस्थितांना संबोधीत करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्रगिरी महाराज होते.
उत्तम महाराज गाडे, बाळासाहेब महाराज रंजाळे, गोवर्धनगिरी महाराज, मधुसूदन महाराज, रामभाऊ महाराज नादीकर, कृष्णाजी महाराज वाघोले, कृष्णाजी महाराज कुंजे, बाबा महाराज उंडे, प्रकाश चित्ते, देविदास चव्हाण, बाबा शिंदे, प्रवीण पैठणकर आदी हिंदु समाज बांधव उपस्थित होता.
यावेळी कालीचरण महाराज यांच्या उपस्थितीमध्ये मेनरोड, शिवाजीरोड ते श्रीराम मंदिर चौक असा भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
कालीचरण महाराज म्हणाले की, हिंदूमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव आहे. त्यांना धर्मशिक्षण दिले जात नाही, त्यामुळे त्यांना धर्माबद्दल काहीच माहित नाही, सध्याच्या काळात त्यांना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे. तुमच्या पुढच्या पिढीला धर्माबद्दल सांगितले नाही, तर विनाश नक्की आहे. त्यामुळे अहिंसेचा त्याग करुन धर्माचे रक्षण करा, असे आवाहन कालीचरण महाराज यांनी केले.
भाजपाचे प्रकाश चित्ते म्हणाले की, श्रीक्षेत्र सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी जे वक्तव्य केले, त्यात वादग्रस्त काहीच नाही. त्यामुळे त्यांच्यावर अनेक ठिकाणी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.