spot_img
spot_img

ममदापुरातील रोकडे वस्तीवर शेतकऱ्याचे घर फोडले १ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल लांबविला; लोणी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील ममदापूर येथील रोकडे वस्तीवर अज्ञात व्यक्तींनी एका शेतकऱ्याच्या बंगल्यात घुसून एक लाख 88 हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात लोणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय म्हसु यादव (वय 52, धंदा-शेती, रा. रोकडे वस्ती, ममदापुर, ता. राहाता) लोणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझी पत्नी मंदाकिनी, मुलगा अक्षय, सुनबाई मोहीनी असे एकत्र राहत असुन मी शेती व्यवसाय करुन कुटुंबाची उपजिवीका करतो व मुलगा अक्षय हा श्रीरामपुर येथील एयु स्मॉल फायनान्स बॅंकमध्ये ये-जा करुन नोकरी करतो.

दि. 12 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण जेवण करुन मुलगा व सुन हे बंगल्याच्या वरच्या रुममध्ये झोपण्यास गेले व पत्नी बंगल्याच्या खालच्या खोलीत झोपली व मी घराशेजारील शेतीला पाणी देत असल्याने दि. 13 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजता बंगल्याच्या खालच्या खोलीत हॉलमध्ये जावुन झोपलो. त्यानंतर रात्री 2:30 वाजेच्या सुमारास पत्नीला बेडरुममध्ये कपाट उघडल्याचा आवाज आल्याने तिला जाग आली व तेव्हा तिने मला झोपतुन उठवले असता त्यावेळी आमचा बोलण्याचा आवाजाने घरातील अज्ञात व्यक्ती लगेचच घराच्या बाहेर निघुन गेले.

तेव्हा आम्ही उठुन घराच्या बाहेर आलो असता किचनरुमच्या दरवाजाला आतील बाजुस कडी लावलेली समजली. अज्ञातांनी किचनच्या दरवाजाची कडी बाहेरुन तोडुन आत प्रवेश करुन घराचे कपाटामधील 55 हजाराचे सोन्याचे गंठण, 2 हजाराची सोन्याची नथ, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी, सोन्याच्या कानातील बाळ्या, एक हजाराचे पायातील चांदीचे पैजन 10 ग्रॅम वजनाचे, हातातील चांदीचेकडे तसेच 1 लाख 30 हजाराची रोख रक्कम व एयु स्मॉल फायनान्स बॅकच्या एकुण 26 चाव्या असे एकूण 1 लाख 88 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

संजय म्हसु यादव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023, 305(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!