अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा) :- दिल्ली गेट येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर व श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट तसेच उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून आयोजित शिव महापुराण कथा सप्ताहाचा सहावा दिवस भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी भगवान महादेवाचे अवतार नंदी, भैरवनाथ आणि श्री जिव्हेश्वर यांच्या महत्त्वाचे निरूपण करत भाविकांना भक्ती, श्रद्धा, निष्ठा, संयम आणि सेवाभावाचा संदेश दिला.
नंदी हे भगवान महादेवाचे परमभक्त असून भक्ती, निष्ठा, संयम, शक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहेत. नंदीने भगवान शंकराची कठोर तपस्या करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. त्यामुळे त्यांना शिवगणांचा प्रमुख मानले जाते. महादेवाच्या मंदिरात नंदीची मूर्ती नेहमी शिवलिंगासमोर विराजमान असते. भक्त नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतात, अशी श्रद्धा असून नंदीच्या माध्यमातून आपली प्रार्थना भगवान शंकरापर्यंत पोहोचते, अशी भाविकांची भावना आहे. नंदी आपल्याला श्रद्धा, निष्ठा, शांतता आणि सेवाभावाचा संदेश देतात, असे महाराजांनी सांगितले.
श्री जिव्हेश्वर हे भगवान शंकराचे अवतार असून त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदतो. त्यांच्या स्मरणातून सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते, असे ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीचे स्मरण करून त्यांच्या महत्त्वाचेही वर्णन केले.
कथा निरूपणादरम्यान महाराजांनी आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. आई-वडिलांच्या सेवेतून जेवढे पुण्य मिळते, तेवढे अन्य कोणत्याही सेवेतून मिळत नाही. शेतकऱ्यांसारखे श्रीमंतीचे काळीज कोणाचेही नसते; त्यामुळे आपल्या मनाला कधीही भिकारी ठेवू नका, असा मोलाचा उपदेश त्यांनी भाविकांना केला. भक्ती केवळ पूजाअर्चेत नसून जीवनातील आचरण, सेवाभाव, कृतज्ञता आणि मनाच्या समृद्धीत असते, असा आध्यात्मिक संदेश त्यांनी दिला.
शिव महापुराण कथा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी महापौर ज्योतीताई गाडे, प्राध्यापक माणिकराव विधाते, महिला व बालकल्याण समिती उपसभापती वर्षा सानप, अमोल गाडे, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, नगरसेवक कुमार वाकळे, निखिल वारे, संजय ढोणे, प्रकाश भागानगरे, नगरसेविका शितल ढोणे, रोशनी त्रिंबके, मयुरी जाधव, गौरी बोरकर, पद्मावती बोरुडे, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, भूषण बिहाणी, सचिन कटारिया, सुशांत जाधव, राजू एकाडे, अशोक कानडे, जितेंद्र लांडगे, संजय सांगावकर, विक्रम पाठक, दीपक गोंधळे, स्वाती शिरसूल, अल्का मुंदडा, अभिजित चिप्पा, दीपक गोंधळे आदी मान्यवरांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथा, निरूपण आणि भक्तिमय वातावरणामुळे कार्यक्रमात आध्यात्मिक उत्साह अनुभवायला मिळाला.
भैरवनाथ हे भगवान शिवाचे उग्र आणि शक्तिशाली स्वरूप मानले जाते. रक्षण करणारे आणि संकटांचा नाश करणारे देवता म्हणून भैरवनाथांची पूजा केली जाते. भैरवनाथांच्या पूजेमुळे भय, संकटे आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक गावांमध्ये भैरवनाथ ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. गावाचे रक्षण करणारे, न्याय देणारे आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारे दैवत म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. नंदीची अढळ भक्ती आणि भैरवनाथांचे रक्षक स्वरूप यांचे स्मरण केल्याने भगवान महादेवाप्रती श्रद्धा अधिक दृढ होते.
– हभप समाधान महाराज शर्मा




Total Users : 683188