अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याविरोधात खासदार नीलेश लंके यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. या घडामोडीमुळे शिक्षण विभागातील कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, आता केवळ शिक्षणाधिकाऱ्यांवरील कारवाईपुरता विषय मर्यादित न राहता शिक्षण विभागातील वर्षानुवर्षे एकाच टेबलवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टेबल बदलाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांपासून काही कर्मचारी एकाच टेबलवर कार्यरत असून, त्यांच्या कामकाजाबाबत शिक्षकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या प्रकरणात लक्ष घालून शिक्षण विभागातील टेबलची फेररचना करावी, अशी मागणी शिक्षकांमधून जोर धरत आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांच्या सेवाविषयक अनेक महत्त्वाच्या बाबी हाताळल्या जातात. बदली, वेतन, पदोन्नती, सेवापुस्तक, वैयक्तिक मान्यता, निवृत्तीवेतन तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी शिक्षकांना या विभागात वारंवार जावे लागते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक टेबलला विशेष महत्त्व आहे. मात्र, काही कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर कार्यरत असल्याने कामकाजात एकाधिकारशाही निर्माण होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून केल्या जात आहेत.




Total Users : 683107