सात्रळ( जनता आवाज वृत्तसेवा ):- प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव हा एक लोकप्रिय सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी, युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे मत महिला रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील यांनी केले.
सन्मा. नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (मंत्री, महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अहमदनगर जिल्हा) यांचे संकल्पनेतून साकारलेला व मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, विळदघाट, अहमदनगर) यांचे मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या सन्मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिताताई विखे पाटील यांच्या प्रेरणेने आयोजित ‘प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२४’ चे आयोजन सात्रळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा प्रांगणात उत्कृष्ट बैठक व्यवस्थेसह करण्यात आले होते. ‘सहकारातून समृद्धीकडे’ हे सांस्कृतिक महोत्सवाचे मध्यवर्ती सूत्र होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. श्री. बाळकृष्ण चोरमुंगे पाटील हे होते. याप्रसंगी मानेवरच्या शुभ हस्ते मोफत भव्य लकी ड्रॉ सोडत काढण्यात आली. यामध्ये अकरा विविध गावातील नागरिकांनी बक्षीस जिंकली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोपानराव शिंगोटे, संस्थेचे संचालक ॲड. आप्पासाहेब दिघे पाटील, जे. पी. जोर्वेकर, वसंतराव डुक्रे, मंदाताई डुक्रे, समेश पन्हाळे, आबासाहेब घोलप, ॲड. पोपटराव वाणी, नारायण धनवट, सुभाष अंत्रे, रवींद्र दिघे, विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
सौ. धनश्रीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या, “या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांना व तरुणांना आपली कला, कौशल्य आणि क्रीडा क्षमता दाखवण्याची संधी मिळते. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य, नाटक, संगीत, वाद्यवृंद व इतर कलाप्रकारांचा समावेश होतो. विद्यार्थी विकास घडविणे, प्रतिभावान विद्यार्थी ओळखणे, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता आणि नेतृत्वगुण विकसित करणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, समाजात एकोप्याची भावना वाढीस लावणे, संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे, स्वास्थ्य आणि फिटनेस राखणे, मनोरंजनातून सामाजिक प्रबोधन घडविणे, मानवी मूल्यांचा प्रचार करणे, बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करणे, परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करणे इत्यादी उद्देश समोर ठेवून सामाजिक जीवनात एक सकारात्मक बदल घडविला जातो. एकूणच, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजाच्या एकत्रिकरणासाठी हा उत्सव आयोजित केला जातो.”
प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विविध शाळा व महाविद्यालयात पर्यावरण पूरक गणपती बनवणे स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रचंड उत्साहात सहभाग नोंदविला. गणपती बाप्पांच्या आगमन प्रसंगी सात्रळ केंद्रातील विविध शाळा, विद्यालय व महाविद्यालयाच्या माध्यमातून लेझीम, ढोल, ताशा, झांज, झेंडा व सहकार दिंडी, पावली खेळणे इत्यादी विद्यार्थी पथकांच्या माध्यमातून भव्य मिरवणूक काढण्यात आल्या. डीजेला फाटा देऊन पारंपारिक भारतीय वाद्याच्या माध्यमातून संस्कृती दर्शन घडविण्यात आले. विविध शाळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या गणपती समोरील सजावटीमध्ये पद्मश्रीचे जीवन व कार्य, सहकार या विषयीचे मध्यवर्ती सूत्र विचारात घेऊन विविध कलाकृतींचे, देखाव्यांचे सप्रयोग सादरीकरण करण्यात आले. प्रवरा सांस्कृतिक महोत्सवातील विविध गुणदर्शन कार्यक्रमात ४६६ नवोदित विद्यार्थी-विद्यार्थिनी कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेतला. या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सात्रळ केंद्रकार्यवाह प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले. आभार ॲड. आप्पासाहेब दिघे पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व प्रमुख केंद्र समन्वयक प्रा. डॉ. सोपानराव शिंगोटे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, प्रा. मधुकर वाणी, प्रा. रोहिदास भडकवाड, प्रा. डॉ. निलेश कान्हे, प्रो. (डॉ.) रामदास बोरसे, कार्यालय अधीक्षक श्री. अनिल गागरे, श्री. महेंद्र तांबे, प्रा. डॉ. एकनाथ निर्मळ, प्रा. हरी दिवेकर, प्रा. डॉ. गंगाराम वडीतके, प्रा. डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. प्रतिभा विखे, प्रा. डॉ. अनंत केदारे, प्रा. देवीदास हारदे, श्री. आदिनाथ माघाडे यांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी, अध्यापक, पालक तसेच पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने उपस्थित होते.



