राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):- तेजेवाडी (ता. जुन्नर) येथील वीटभट्टी व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या नातवावर आज पहाटे बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात ९ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुपेश तान्हाजी जाधव (रा. म्हैसगाव) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. रुपेश हा २ दिवसांपूर्वीच तेजेवाडी येथे आपल्या आजोबाकडे आला होता.
आज बुधवार (दि. २५) सकाळी रुपेशला त्याचे आजोबा शौचास बाहेर घेऊन गेले त्यावेळी वीट भट्टीच्या बाजूला रुपेश हा शौचास बसला होता. यावेळी पाठीमागून बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. आणि ओढत उसाच्या शेतात घेऊन नेले. आजोबांनी हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरडा केली. तेव्हा विटभट्टीवरील लोक जमा झाल्याने बिबट्या रुपेश यास उसाच्या सरीत सोडून पळाला.
घटनेची माहिती मिळताच वनविभाग घटनास्थळी दाखल झाले. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांनी तातडीने घटनास्थळी दिली भेट देऊन मृत झालेल्या मुलाच्या कुटुंबांचे सांत्वन केले.



