श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :- आचारसंहितेची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर मतदारसंघातून महायुतीकडून इच्छूक असलेले जितेंद्र तोरणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना शिंदेगट यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता व महायुतीकडून शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छूक उमेदवार असणार आहेत. त्यांच्या प्रवेशाच्यावेळी मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे प्रवक्ते आ.संजय शिरसाट तसेच आ.प्रा. रमेश बोरणारे, आ.प्रदीप जयस्वाल आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून तोरणे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीची तयारी सुरू केली. नुकत्याच झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभाग घेवून त्या ठिकाणी त्यांनी भाषण करत आपण भूमिपुत्र असल्याने आपल्याला संधी मिळावी,अशी अपेक्षा बोलून दाखवली.
त्यानंतर आता नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जितेंद्र तोरणे यांचे ग्रामीण भागात दौरे सुरू झाले आहेत. मूळचे पढेगाव, ता. श्रीरामपूर येथील असलेल्या जितेंद्र तोरणे यांचा ‘भुमिपूत्र’ म्हणजेच स्थानिक उमेदवार यावर अधिक भर आहे. सद्या ते जनतेबरोबर संपर्क ठेवण्याबरोबरच उमेदवारी मिळण्यासाठी महायुतीकडून प्रयत्नशिल आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून काल त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी खा. सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याबरोबरच आता जितेंद्र तोरणे हेही एक इच्छूक उमेदवार ठरणार आहेत. महायुतीकडून नितिन दिनकर, नितीन उदमले इच्छूक असून त्यांनी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी मुंबईत जावून चर्चा केली. उमेदवारी निश्चितीबाबत अजून वेळ असला तरी प्रत्येकजण आपल्यापरीने प्रयत्नशील असल्याचे दिसते.