शिरूर( जनता आवाज वृत्तसेवा): शिरूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ पैकी १२ जागांवरील संचालकांची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित पाच जागांसाठी १२ उमेदवार परस्परांविरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान,१२ पैकी ११ संचालक महायुतीचे असल्याने महायुतीने खरेदी-विक्री संघावर वर्चस्व प्रस्थापित केल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित जागांसाठी येत्या नऊ मार्चला निवडणूक होत आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिमक्षणी नाट्यमय घडामोडी घडल्या. यातून संपूर्ण निवडणूकच बिनविरोध करण्यासाठीआमदार माऊली कटके यांच्यासह जिल्हादूध संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर,खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे यांनी पुढाकार घेऊन अनेक इच्छुकांशी तसेच इतर पक्षीय नेत्यांशीही संपर्क साधून चर्चा केली. विशेषतः आमदार कटके यांच्या राजकीय शिष्टाईला यश आले व ६७ पैकी ४३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
भाजपचे तालुकाध्यक्ष प्रदीप ऊर्फ आबासाहेब सोनवणे, माजी आमदारअशोक पवार यांचे पुतणे सचिन पवार व भाजपचे कार्यकर्ते सुरेश पलांडे या विद्यमान संचालकांनी माघार घेतल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्याशिवाय प्रतिभा नागवडे, गणेशरोडे, बाबाजी निचित या प्रमुखांचाही माघारीच्या यादीत समावेश आहे.
खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र उत्तम नरवडे यांच्यासह राहुल ऊर्फ किसन आनंदराव गवारे व लहू बाळासाहेब थोरात यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून, अर्ज माघारीनंतर संघाचे माजी अध्यक्ष शरद वसंत कालेवार, नामदेव जयवंत गिरमकर, गुलाबराव बबन सातपुते,बाळासाहेब माणिकराव टेमगिरे, कानिफनाथ दादाभाऊ भरणे, मनिषा सुनील शेलार, सुजाता राजेंद्र नरवडे, संभाजी काळूराम भुजबळ व विवेक उत्तमराव सोनवणे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्गमोकळा झाला.
दरम्यान, बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचा आमदार कटके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. १२ पैकी ११ संचालक महायुतीचे असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीरावआढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी- विक्री संघाच्या ११जागांवर महायुतीने वर्चस्व मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित जागांवर देखील महायुतीजोमाने लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती राजेंद्र जासूद, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस राजेंद्र कोरेकर, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावडे, युवा नेते स्वप्नील गायकवाड,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष अमोल वर्पे,कार्याध्यक्ष कुंडलिक शितोळे, शिरूर शहर अध्यक्ष एजाज बागवान, रंजन झांबरे, सुनील जाधव, विजय ढमढेरे, सोपानराव गवारे आदी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीनंतर शिरूर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ या तालुकास्तरीय संस्थेवर देखील महायुतीने वर्चस्व मिळविल्याने हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला व विशेषतःमाजी आमदार अशोक पवार यांना धक्का मानला जातो. विधानसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या यापहिल्या तालुकास्तरीय निवडणुकीत आमदार माऊली कटके हे फारसा राजकीय हस्तक्षेप करणार नाहीत, तर माजी आमदार पवार हे पराभवातून सावरताना पुन्हा कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून नेटाने या निवडणुकीला सामोरे जातील,
अशा यानिवडणुकीच्या सुरवातीला राजकीय निरीक्षकांच्या अटकळी होत्या. प्रत्यक्षात उलटे फासे पडल्याचे दिसून आले. आमदार कटके हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी जय्यत तयारीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र होते, तर अर्ज माघारीच्या महत्त्वाच्या घडामोडींवेळी अशोक पवार यांनी पडद्यामागून हालचालीवरच लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले. त्यातून बिनविरोध झालेल्या १२पैकी केवळ एका जागेवर त्यांना समाधान मानावे लागले, तर महायुतीने खरेदी- विक्री संघावर निवडणुकीपूर्वीच वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसूनआले.




Total Users : 624408