spot_img
spot_img

भोंदू प्रकरणानंतर काका कोयटे यांचा राजीनामा; पतसंस्था फेडरेशनमध्ये खळबळ

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-राज्यभरातील पतसंस्थांच्या क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडत समता पतसंस्थेचे संस्थापक ओमप्रकाश उर्फे काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या भोंदू अशोक खरात याच्या समता पतसंस्थेशी कथित संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते.

राज्य पतसंस्था फेडरेशन हे सुमारे १५ हजार पतसंस्थांचे प्रतिनिधित्व करणारे आणि जवळपास ६ हजार सभासद असलेले प्रभावी संघटन मानले जाते. या संघटनेच्या अध्यक्षपदी कोयटे २०१५ पासून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात फेडरेशनने विविध धोरणात्मक मुद्द्यांवर सरकारशी संवाद साधत पतसंस्था क्षेत्रातील प्रश्न मांडले होते.

मात्र, अलीकडेच अशोक खरात या भोंदू व्यक्तीचे समता पतसंस्थेशी संबंध असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला. या प्रकरणामुळे फेडरेशनची प्रतिमा धोक्यात येऊ नये, तसेच संस्थेवरील विश्वास अबाधित राहावा या हेतूने कोयटे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

दरम्यान, या आरोपांवर स्पष्टीकरण देताना कोयटे यांनी यापूर्वीच “मी भोंदू खरातचा भक्त नाही, कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही,” असे स्पष्ट केले होते. तरीही वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदत्याग केल्याचे मानले जात आहे.

कोयटे यांच्या राजीनाम्यानंतर फेडरेशनच्या पुढील नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, नव्या अध्यक्षाची निवड लवकरच होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे पतसंस्था क्षेत्रात काही काळ अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!