खंडाळा(जनता आवाज वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील नांदूर येथे उसाच्या चार एकर क्षेत्राला आग लागून सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली.
याबाबतची माहिती अशी की नांदूर ( ता.राहाता ) येथे गट नंबर १५/०२ मध्ये बाळासाहेब रावसाहेब जाधव यांची शेतजमीन आहे.काल शुक्रवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली असल्याची माहिती शेजारी असलेले ऋषिकेश हिवरकर यांनी त्यांना मोबाईलवरून दिली. त्यावरून ते तातडीने लोणीहून घटनास्थळी पोहोचले.तोपर्यंत त्यांचे उभे असलेले ९०आर खोडवा उसाचे क्षेत्र तसेच ७० आर सुरू उसाचे क्षेत्र अर्ध्या भागापर्यंत जळाले होते.
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीमध्ये श्री जाधव यांनी म्हटले आहे की मी तातडीने आगीच्या घटनेबाबत डॉ.पद्मश्री विखे पाटील कारखान्याच्या अग्निशमन दलाला कळविले.अग्निशमन दलाचे बंब १ वाजेपर्यंत आले.
परंतू तोपर्यंत संपूर्ण ऊस तसेच ९० आर खोडवा पिकातील ठिबक जळून खाक झाले.या घटनेमुळे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे जाधव यांनी तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.




Total Users : 684942