राहुरी(जनता आवाज वृत्तसेवा):- बेकायदा मुरूम वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्याला ट्रकच्या चाकाखाली टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुरूम माफियांच्या टोळीवर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. राहुरी पोलिसांनी टोळीप्रमुखासह आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १११ अंतर्गत संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केला असून, ही कारवाई मोक्का अंतर्गत करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात २७ ऑक्टोबर रोजी बेकायदा मुरूम वाहतुकीवर कारवाई करताना उपविभागीय अधिकारी विनीत विक्रांत शिर्के यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. विनानंबरचा मुरूम भरलेला हायवा पकडल्यानंतर वाहन जप्त करण्यासाठी शिर्के हे हायवामध्ये बसून राहुरीकडे येत होते. त्यावेळी पिंपळगाव फुणगी येथे आरोपींनी मोटारसायकली आडव्या लावून हायवा अडविला.
त्यानंतर आरोपींनी शिर्के यांना वाहनातून खाली खेचून ट्रकच्या चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडी मारल्याने त्यांचा जीव वाचला. आरोपी हायवा घेऊन पसार झाले. पळून जाताना रस्त्यावर मुरूम टाकून अडथळा निर्माण केल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दिपक ऊर्फ प्रविण बबन लाटे (टोळीप्रमुख), धनराज चौधरी, सतीश कुदनर, तुषार जाधव, शरद भोसले, दत्ता माळी, अक्षय पवार आणि अर्जुन निकम यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यापैकी धनराज चौधरी, सतीश कुदनर आणि तुषार जाधव यांना अटक झाली असून, दिपक लाटेसह पाच आरोपी फरार आहेत.
टोळीविरोधात १५ गंभीर गुन्हे
पोलिस तपासात दिपक लाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध मुरूम चोरी, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा, जबरी चोरी, विनयभंग, तडीपार आदेशाचे उल्लंघन यासह १५ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार करून सातत्याने गुन्हेगारी कारवाया केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी कलम १११ अंतर्गत कारवाई केली.
मोक्का कारवाईला मंजुरी
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास केल्यानंतर अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संघटित गुन्हेगारीच्या वाढीव कलमास मंजुरी दिली. भारतीय न्याय संहितेतील कलम १११ हे संघटित गुन्हेगारीविरोधातील कठोर कलम असून, त्यात मोक्का कायद्यासारख्या शिक्षेची तरतूद आहे.
पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
महसूल अधिकाऱ्यावरील हल्ल्याने खळबळ
शासकीय अधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणून जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुरूम माफियांवर झालेली ही कारवाई जिल्ह्यातील गौण खनिज तस्करांसाठी मोठा इशारा मानली जात आहे.




Total Users : 684674