कोपरगांव (जनता आवाज वृत्तसेवा) :-दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी महायुती शासनाचे कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणुन नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत प्रभावीपणे काम करून जल समृध्दी योजनेतुन प्रत्यक्ष कामावर भर दिला. तुटीच्या गोदावरी खो-यात पाण्याची समृध्दी व्हावी यासाठी नदी जोड प्रकल्पातुन ७८ टीएमसी पाणी आणण्याबाबतच्या कामाला सुरूवात होवुन त्यांचे जाणिवपुर्वक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी केले.
जिल्हयाच्या क्रांतिकारी कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या जलव्यवस्थापन कार्याचा ठसा संपुर्ण देशभर उमटविला त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमीत्त गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा जन्मभुमी चौंडी (अहिल्यानगर) व त्रंबकेश्वर (नाशिक) येथुन शुभारंभ करण्यांत आला असुन ११७ नद्यांचे पाणी एकत्र करून त्याचा जलकलश सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी आला असता त्याचे पुजन करतांना ते बोलत होते. उपस्थित मान्यवरांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतींने सत्कार करण्यांत आला.
प्रारंभी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी प्रास्तविकात या जलयात्रेची संकल्पना स्पष्ट करून मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई अजितदादा पवार व सर्व मंत्रीमंडळ दुष्काळमुक्त महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी जलसमृध्दीच्या ज्या योजना प्रभावीपणे राबवित आहे त्याचा आपल्यासह सर्व शेतक-यांना अभिमान आहे. अहिल्यानगर जिल्हयाच्या कन्या अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याण, धार्मिक सांस्कृतिक समाजाभिमुख विकास, मंदिर पुर्नबांधणी, घाट निर्माती, धर्मशाळा, तीर्थ विकास, लोकहितवादी प्रशासन, जल व्यवस्थापन, लघुसिंचन आदि कामातुन जलव्यवस्थापनाला दिशा दिली. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमीत्ताने जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी संपुर्ण राज्यभर गोदा ते नर्मदा जलयात्रा काढुन अहिल्यादेवींच्या कार्याची सर्वांना जाणीव करून देत आहेत. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनीही पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमातुन कोपरगांव पंचक्रोशीतील भुगर्भातील पाण्याची समृध्दी टिकवुन ठेवण्यासाठी शेकडो बंधारे बांधुन जलसमृध्दीचे कार्य केलेले आहे.
याप्रसंगी आमदार गोपिचंद पडळकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय प्रगल्भ आहे.अहिल्यादेवींनी घाट, विहिरी, धर्मशाळा आणि मंदिरांचा जीर्णोद्धार करणे हे खूप मोठे काम केले आहे. अहिल्यादेवींचे काम हातामध्ये घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ जल यात्रा काढली नसून , महाराष्ट्राला जलमुक्त करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून ही यात्रा आयोजित केली आहे.अहिल्यानगर नामकरणाचा अभिमान देशभरातील अहिल्याभक्तांना आहे.या वर्षी पहिल्यांदाच अशी जलयात्रा निघाली आहे जी चौंडी येथून महेश्वरपर्यंत जात आहे. “गोदा ते नर्मदा” अशी ही यात्रा असून, याचे सर्व श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाते.इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावागावात हजारो लोक जलयात्रेचे स्वागत करण्यासाठी उभे आहेत. अहिल्यादेवींना पाण्याचे महत्त्व माहिती होते. “जल है तो कल है” या भावनेतून त्यांनी पाण्याचे व्यवस्थापन केले.मात्र महाराष्ट्रात काही काळ पाण्याचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला गेला. दुष्काळी तालुके कायम दुष्काळी ठेवले गेले. त्यांच्या मतांचा वापर करून घेतला गेला. त्या लोकांना फक्त ऊसतोडीसाठी वापरले गेले, परंतु त्यांना पाणी दिले गेले नाही.मात्र आता महाराष्ट्रात पहिल्यांदाच असे घडत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याला हजारो कोटी रुपयांचा निधी एका योजनेसाठी एकाच वेळी उपलब्ध करून दिला जात आहे. हे सरकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार राम वडकुते, माजीमंत्री व शेतक-यांचे नेते सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्यकारी संचालक संतोष तिरमवार, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक,शेतकरी, कार्यकर्ते आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी नगराध्यक्ष पराग संधान यांनी आभार मानले.



