कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):-कोपरगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दीर्घकालीन प्रश्न आता मार्गी लागणार असून स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) २.० अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेस सामुदायिक व सार्वजनिक शौचालये तसेच स्वच्छतागृहांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७५ सीट्सना मंजुरी मिळाली असून लवकरच आणखी ७५ सीट्स मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात येणाऱ्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच दिवसभर व्यवसायात गुंतलेल्या व्यापाऱ्यांना व महिला भगिनींना स्वच्छ व सुलभ सार्वजनिक स्वच्छतागृहांची मोठी अडचण भासत होती. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत आधुनिक, स्वच्छ व सुसज्ज शौचालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असून शहराच्या स्वच्छतेतही लक्षणीय सुधारणा होईल.
यासाठी मा.आ. स्नेहलताताई कोल्हे व आ. विवेकभैय्या कोल्हे यांचे विशेष सहकार्य व पाठपुरावा झाल्याने हा निधी उपलब्ध होण्यास मदत झाल्याचेही नगराध्यक्षांनी नमूद केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर होऊ शकला असून शहराच्या विकासासाठी हे मोठे पाऊल ठरणार आहे.उपनगराध्य जितेंद्र रणशूर व आरोग्य सभापती वैभव आढाव यांचेही विशेष लक्ष या कामाच्या वेगाने पूर्ततेकडे असणार आहे.
नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने या कामांना लवकरात लवकर सुरुवात करून दर्जेदार व टिकाऊ स्वच्छतागृहांची उभारणी करण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून कोपरगाव शहराला अधिक स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज बनविण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.



