spot_img
spot_img

कोल्हार येथे फार्मर कप स्पर्धा व ऊस हुमणी नियंत्रण मार्गदर्शन बैठकीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  कृषक शेतकरी गट, कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथे फार्मर कप स्पर्धा व ऊस हुमणी नियंत्रण मार्गदर्शन बैठकीस शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून याकरिता  कोल्हार येथील  कृषक शेतकरी गट, कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिकातील हुमणी नियंत्रण, जैविक शेती, फार्मर कप उपक्रम आणि शेतकरी मार्गदर्शन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन बैठक उत्साहात पार पडली. ही बैठक प्रवरा कारखाना संचालक  ज्ञानेश्वर खर्डे पाटील यांच्या वस्तीवर आयोजित करण्यात आली होती.

 कोल्हार परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक शेतीविषयक माहिती जाणून घेतली.बैठकीत पाणी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः “फार्मर कप” या राज्यस्तरीय उपक्रमामधून शेतकऱ्यांनी गटशेती, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि उत्पादनवाढ यासाठी कसे प्रयत्न करावेत याविषयी सखोल माहिती देण्यात आली. यावेळी कृषक शेतकरी गटाने पाणी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय “फार्मर कप” स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती देण्यात आली. या सहभागामुळे गावपातळीवर सामूहिक शेती, पाणी संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.

यावेळी कृषी अधिकारी राजेश पऱ्हे आणि पाणी फाउंडेशनचे समन्वयक वैभव गरुडकर यांनी “फार्मर कप” उपक्रमाचे महत्त्व, त्यामधील स्पर्धा, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे तसेच गावपातळीवर सामूहिक सहभागाची गरज यावर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन शेतीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.

तसेच आत्मा कृषी विभागाचे कडू सर यांनी जैविक खते, जैविक औषधे, मातीची सुपीकता वाढविण्याचे उपाय आणि गटशेतीच्या माध्यमातून खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे तंत्र समजावून सांगितले. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

झायडेक्स इंडस्ट्रीजचे एग्रोनॉमिस्ट श्री. सुशांत कुंभार यांनी ऊस पिकातील हुमणी या किडीमुळे होणारे नुकसान, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, जैविक नियंत्रण पद्धती आणि उत्पादन वाढीसाठी आवश्यक व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य वेळी नियंत्रण केल्यास हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास कृषी सहायक मनीषा जाधव उपस्थित होत्या. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत शासनाच्या विविध कृषी योजना, पीक व्यवस्थापन आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून होणारे फायदे याविषयी माहिती दिली.

बैठकीत शेतीसंबंधित विविध प्रश्नांवर उपस्थित शेतकऱ्यांनी चर्चा केली. आधुनिक शेती तंत्रज्ञान, पाण्याचे व्यवस्थापन, उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढविणे या विषयांवर मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाणी फाउंडेशन टीम, कृषक शेतकरी गट व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेतीची दिशा देणाऱ्या अशा मार्गदर्शन बैठका भविष्यातही आयोजित करण्यात येणार असल्याचे ज्ञानेश्वर खर्डे पाटील (संचालक, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, (प्रवरानगर) यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!