spot_img
spot_img

विधान परिषद रणधुमाळीचा बिगुल; अहिल्यानगरसह १६ जागांसाठी निवडणुका जाहीर, राजकीय समीकरणांना वेग

मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील प्रलंबित १६ विधान परिषद जागांसाठी अखेर निवडणुकीची घोषणा करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. अहिल्यानगरसह अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांमुळे उमेदवारी, पक्षांतर आणि नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना वेग आला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सोलापूर, अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर), ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक आणि अमरावती या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील विधान परिषद जागांसाठी निवडणुका होणार आहेत. याशिवाय एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणूकही जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने या जागा रिक्त होत्या. परिणामी विधान परिषदेचे संख्याबळही कमी झाले होते. मात्र अलीकडे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध झाली. नियमानुसार संबंधित मतदारसंघातील किमान ७५ टक्के मतदार उपलब्ध असल्यास निवडणूक घेण्याची तरतूद आहे. ही अट पूर्ण झाल्यानंतर अखेर निवडणूक आयोगाने निवडणुकांचा मार्ग मोकळा केला.

या निवडणुकांबरोबरच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेवर निवडून आल्यानंतर दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषद जागेसाठीही पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणूक प्रक्रियेला अधिक राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही मतदारसंघांमध्ये क्रॉस व्होटिंग, धक्कातंत्र आणि अपक्षांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू केल्याने आगामी काही दिवसांत राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची चिन्हे आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!