नाशिक( जनता आवाज वृत्तसेवा) :- कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भाव मिळत असताना केंद्र सरकारने दर स्थिरीकरण योजनेंतर्गत प्रति किलो १२ रुपये ३५ पैसे दराने खरेदी करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आठवडाभरात कांद्याला किमान २४ रुपयांपेक्षा अधिक दर देण्याबाबत निर्णय झाला नाही, तर २६ मे रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करून दिल्लीकडे जाणारी वाहतूक रोखली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सोमवारी आंदोलनात्मक वातावरण पाहायला मिळाले. पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आमदार पवार यांनी कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टरचे सारथ्य करत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. या वेळी भास्कर भगरे, जयदत्त होळकर, दत्ताभाऊ पाटील, माणिकराव शिंदे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, रोहित पवार आंदोलन करणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर आधीच पसरल्याने बाजार समिती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रारंभी भाषण टाळत आमदार पवार यांनी थेट शेतकऱ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. “सध्या तीन, चार ते आठ रुपये किलो दराने कांदा विकला जातो, हा दर परवडणारा आहे का?”, “रब्बी कांद्याच्या लागवडीचा खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक आहे का?”, “खत, मजुरी आणि वाहतूक खर्च वाढला आहे का?” असे प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारले. त्यावर शेतकऱ्यांनी हात वर करून नाराजी व्यक्त केली.
“हा दर कायम राहिला तर पुढे काय करणार?” या प्रश्नावर काही शेतकऱ्यांकडून “आत्महत्या” असे उत्तर आल्याने वातावरण काही काळ गंभीर झाले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, “असा विचार करून चालणार नाही. महाराष्ट्रात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे.”
निवडणुकीपूर्वी २०२३ मध्ये सरकारने कांद्याला २४ रुपये दर दिला होता. आता खर्च प्रचंड वाढलेला असताना केवळ १२ रुपये ३५ पैसे दर जाहीर करणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याचा आरोप त्यांनी केला. “ट्विट करून शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. सरकारला ठोस निर्णय घ्यावाच लागेल,” असे सांगत त्यांनी केंद्र सरकारला थेट लक्ष्य केले.
तसेच मागील काही महिन्यांत कमी दराने कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
२६ मे रोजी महामार्गावर आंदोलनाचा इशारा
सरकारने आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर २६ मे रोजी सकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल आणि दिल्लीकडे जाणारी वाहतूक रोखली जाईल, असा स्पष्ट इशारा रोहित पवार यांनी दिला. त्यामुळे राज्यातील कांदा प्रश्न पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.



