spot_img
spot_img

भाजपचे ‘धक्कातंत्र’; कोतकरांच्या नावाने नगरच्या राजकारणात खळबळ विधान परिषदेसाठी गुप्त हालचालींना वेग; शिर्डीत राजनाथ सिंहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची चर्चा

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी रंगू लागली असताना, भाजपकडून माजी महापौर संदीप कोतकर यांचे नाव अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत कोतकर यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यास केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत शनिवारी शिर्डीत होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागेसाठी अनेक दिग्गज इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जागा रिक्त राहिली होती. आता निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. या शर्यतीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे बंधू व माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्यासह माजी महापौर संदीप कोतकर यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून कोतकर यांनी पडद्यामागून राजकीय हालचाली तीव्र केल्याचे बोलले जात आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान कोतकर परिवाराने घेतलेली भूमिका अद्यापही चर्चेचा विषय ठरत आहे. कोतकर यांच्या पत्नी व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर या निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या; मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. त्यानंतर महापालिका निवडणुकीत ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनीही सुरुवातीला जोरदार मोर्चेबांधणी केली होती, पण अखेरीस त्यांनीही पाऊल मागे घेतले. सलग दोन निवडणुकांमधील माघारीनंतर आता कोतकर परिवार विधान परिषदेसाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

या निवडणुकीत महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवक निर्णायक भूमिका बजावणार असल्याने प्रत्येक पक्षाकडून मतदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. जिल्ह्यात भाजपकडे सर्वाधिक मतदार असल्याने इच्छुकांसाठी भाजपची साथ महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळेच संदीप कोतकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिक राजकीय वजन प्राप्त झाले आहे.

भाजप नेतृत्वालाही स्थानिक पातळीवर प्रभावी नेटवर्क उभे करू शकणारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि संघटनात्मक ताकद असलेला उमेदवार हवा असल्याची चर्चा आहे. कोतकर यांच्याकडे ही क्षमता असल्यामुळेच वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. पुण्यात या संदर्भातील चर्चेची पहिली फेरी झाल्याची माहितीही राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

दरम्यान, राहुरी पोटनिवडणुकीत माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेल्या माघारीमुळे भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. त्या राजकीय ‘त्यागा’ची परतफेड म्हणून तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा पर्याय भाजपसमोर असल्याचीही चर्चा आहे. मात्र, तनपुरे यांच्याकडून भाजपला अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने समीकरणे सातत्याने बदलताना दिसत आहेत.

दुसरीकडे, आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्या नावाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या समर्थकांकडून “नेक्स्ट एमएलसी” अशा आशयाच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, जगताप कुटुंबीयांची पुढील भूमिका काय राहणार याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

या सर्व घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाचा राजकीय धागा म्हणजे आमदार अक्षय कर्डिले आणि संदीप कोतकर यांच्यातील कौटुंबिक नाते. कर्डिले हे कोतकर यांचे मेहुणे आहेत. राहुरी पोटनिवडणुकीत सुवर्णा कोतकर आणि उदयनराजे कोतकर हे अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्यामुळे संदीप कोतकर यांनी भाजपकडून उमेदवारी घेतल्यास कर्डिले-कोतकर हे एकाच राजकीय व्यासपीठावर दिसण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

दरम्यान, भाजपच्या संभाव्य ‘धक्कातंत्रा’मुळे अहिल्यानगरच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत. अखेर भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!