श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- कुटुंबातील भावनिक दुरावा आणि किरकोळ कारणातून उद्भवलेल्या संतापाने एका सुशिक्षित तरुणाकडून स्वतःच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बुधवारी पहाटे उघडकीस आली. वडिलांनी रात्री मारलेल्या चापटीचा राग मनात धरून मुलाने झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात टिकाव घालून त्यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारती सचिन ढोकचौळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा प्रणव सचिन ढोकचौळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणव ढोकचौळे याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तो गुजरातमध्ये नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी तो गावी परतला होता. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास घरातील सदस्य आपापल्या कामात असताना भारती ढोकचौळे या घराच्या मागील बाजूस गेल्या होत्या. काही मिनिटांनी परतल्यानंतर त्यांना पती सचिन ढोकचौळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याजवळ टिकाव पडलेला होता.
आरडाओरड ऐकून कुटुंबीय जमा झाले. त्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या प्रणवला हाक मारण्यात आली. त्यावेळी त्यानेच वडिलांच्या डोक्यात टिकाव मारल्याची कबुली दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. लहान भावावर अधिक प्रेम केले जात असल्याची भावना आणि रात्री वडिलांनी मारलेल्या चापटीचा राग यामुळे हे कृत्य केल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे खंडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुशिक्षित कुटुंबात घडलेल्या या रक्तरंजित घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे.पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.



