मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यभर गाजलेल्या भोंदू अशोक खरातवर आधारित असलेल्या महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेतील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला आहे.
‘आता सगळं उघड होणार…!’ ही टॅगलाईन घेऊन येणारा हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी उघड होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं. राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक हे या भोंदूचे भक्त असल्याचं समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचं उघडकीस आलं. याच प्रकरणात रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
अशोक खरातच्या या सर्व कारनाम्यावर आता चित्रपट तयार होत असून येत्या 2 ऑक्टोबर रोजी तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच रिलीज झाला असून त्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत असलेल्या दिपाली सय्यद यांचा पहिला लूक समोर आला.
या टीझरमध्ये अभिनेत्री या भोंदू खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. अशोक खरातचा कारनामा उघडकीस आल्यानंतर रुपाली चाकणकरांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत आहेत. नेमका हाच प्रसंग या टीझरमधून समोर आणण्यात आला आहे.
दरम्यान, ‘आता सगळं उघड होणार…!’ हि टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत.
‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. या चित्रपटाची कथा सागरकुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे.



