spot_img
spot_img

कोल्हारच्या बँक कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):-  तालुक्यातील डिग्रस येथील अमोल पाराजी गावडे (वय ४०) यांचा 29 जून रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे डिग्रस परिसरात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोल गावडे हे कोल्हार येथील एका बँकेत कार्यरत होते. 29 जून रोजी रात्री बँकेचे काम पूर्ण करून ते त्यांच्या दुचाकीवरून डिग्रस येथील घरी परतत होते. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास डिग्रस फाटा परिसरात रस्ता ओलांडत असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की अमोल गावडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

घटनेनंतर सहाय्यक फौजदार तुलसीदास गीते आणि पोलीस नाईक सागर नवले यांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने अमोल गावडे यांना रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमोल गावडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि अवघ्या 11 महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, अमोल गावडे यांच्या पार्थिवावर काल, 30 जून रोजी सकाळी डिग्रस येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!