नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा शहराला इंटरनेटच्या वायरींचा अक्षरशः विळखा पडला असून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील बहुतांश इंटरनेटच्या वायरी थेट महावितरणच्या वीज खांबांवरून टाकण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळा सुरू असल्याने वीज खांबांवरून गेलेल्या या वायरी भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार तक्रारी करूनही नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले आणि नगरपंचायत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे “नगराध्यक्ष साहेब, एखादा बळी गेल्यावरच जाग येणार का?” असा संतप्त सवाल आता शहरभरातून विचारला जात आहे.
नेवासा शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी महावितरणच्या वीज खांबांवर इंटरनेटच्या वायरींचे मोठे जाळे पसरलेले आहे. अनेक ठिकाणी या वायरी वीज वाहिन्यांच्या अगदी जवळून गेल्या असल्याचे दिसून येते. त्यामुळे पावसाळ्यात शॉर्टसर्किट, विद्युत प्रवाहाचा धोका किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.
या गंभीर प्रश्नाबाबत नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले आणि नगरपंचायतीकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र, शहरातील इंटरनेटच्या धोकादायक वायरी हटविण्यासाठी कोणतीही विशेष मोहीम राबविण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
संतप्त नागरिकांचा सवाल आहे की, सर्वसामान्यांच्या जीवाशी संबंधित प्रश्नही प्रशासनाला प्राधान्याचा वाटत नसेल, तर लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी नेमकी कोण पार पाडणार? शहरात एखादी अनुचित घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही तातडीने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. महावितरणच्या वीज खांबांवरून नेण्यात आलेल्या इंटरनेटच्या वायरींची तातडीने तपासणी करून त्या नियमबाह्य अथवा धोकादायक असल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच नगरपंचायतीने शहरातील इंटरनेटच्या वायरींचे सर्वेक्षण करून धोकादायक जाळे त्वरित हटवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“आधी नागरिकांचा जीव वाचवा, नंतर इतर विकासकामे करा,” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी नगराध्यक्षांना आठ दिवसांचा इशारा दिला आहे. या कालावधीत इंटरनेटच्या धोकादायक वायरी हटविण्याची कारवाई सुरू झाली नाही, तर नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपंचायत प्रशासन आणि महावितरणने संयुक्तपणे तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.



