श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा) :-आकाश दुबैय्या हत्या प्रकरणानंतर श्रीरामपूर शहरात निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी नागरिकांना दिलासा देत, “श्रीरामपूरकरांनी कोणतीही भीती बाळगू नये. येथील प्रत्येक नागरिक आमच्या कुटुंबाचा सदस्य असून त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे,” असे स्पष्ट केले. शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तक्रार निवारण दिनानिमित्त शनिवार (दि. १८) रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनच्या कार्यालयात व्यापारी आणि शहरातील प्रमुख नागरिकांशी थेट संवाद साधला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांच्या मनातील भीती दूर करणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाश दुबैय्या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना सुदर्शन म्हणाले, “तपास योग्य दिशेने सुरू आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. थोडा वेळ लागेल, मात्र आरोपींना न्यायालयापर्यंत पोहोचविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.”
गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी आतापर्यंत विविध गुन्ह्यांतील १४ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोशल मीडियावरील अफवांबाबत नागरिकांना सावध करताना त्यांनी, “कोणतीही माहिती पडताळणी न करता पुढे पाठवू नका. सोशल मीडियावरील अप्रमाणित पोस्टवर विश्वास ठेवल्यास गैरसमज पसरतात. नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा,” असे आवाहन केले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.



