नवी दिल्ली (जनता आवाज वृत्तसेवा):- ठाकरे यांच्या पक्षातील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांचे भवितव्य काय असेल, असे विचारले जात होते. खासदार बंडखोरी करणार हे लक्षात येताच ठाकरे यांच्या पक्षाने कायदेशीर पावलं टाकायला सुरुवात केली होती.
काहीही झालं तरी बंडखोरी केलेल्या बंडखोरांची खासदारकी जाणारच, असा दावा ठाकरे गटाकडून केला जात होता. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी माहिती समोर येत आहे. बंडखोर खासदारांच्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील विलिनीकरणास मंजुरी देण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा सचिवालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या सहा बंडखोर खासदारांनी ठाकरे गटापासून फारकत घेत वेगळा गट स्थापन केला होता. तसे पत्रही या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिले होते. दुसरीकडे ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन आमच्या पक्षाने कोणामध्येही विलीन होण्याचा निर्णय घेतलेला नाही. आमचा पक्ष स्वतंत्र आहे, अशा आशयाचे पत्र दिले होते. तसेच कोणताही निर्णय घेण्याआधी आमची बाजू जाणून घ्यावी, अशी विनंतही ठाकरे गटाने लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. परंतु आता ठाकरे गटाला जबर धक्का देणारी ही माहिती समोर आली आहे.



