राहता ( जनता आवाज वृत्तसेवा):- जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने राहता नगरपालिकेच्या सभागृहात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी राहतातालुक्यातील व शहरातील नागरिकांनी विविध नागरी सुविधा, विकासकामे तसेच वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाच्या अडीअडचणी निवेदनाद्वारे डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासमोर मांडल्या.
जनता दरबारात प्रत्येक नागरिकाची समस्या संयमाने ऐकत डॉ. सुजय विखे पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. तातडीने मार्गी लावता येणाऱ्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देतानाच उर्वरित प्रश्नही प्राधान्याने सोडविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना दिली.
याप्रसंगी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी लोंढे, विविध विभागांचे अधिकारी तसेच भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता दरबारात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, नागरी सुविधा, शासकीय योजनांचा लाभ तसेच स्थानिक विकासाशी संबंधित विविध प्रश्न नागरिकांनी मांडले. प्रत्येक निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिल्या.
नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा हा उपक्रम प्रशासन आणि जनतेतील समन्वय अधिक बळकट करणारा ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.



