spot_img
spot_img

दुष्टांचा नाश, भक्तांचे रक्षण आणि धर्मसंस्थापनेसाठी भगवंताचा अवतार – महंत रामगिरीजी महाराज  खंडोबाच्या वाकडीतून सर्वाधिक पाच गाड्या भाकरी प्रसाद  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखाना व विखे परिवाराच्यावतीने १०१ पोते साखर 

प्रतिनिधी- किरण शिंदे

वाकडी (जनता आवाज वृत्तसेवा)- भगवंताच्या अवतारामागे दुष्टांचा नाश, भक्तांचे रक्षण आणि धर्माची संस्थापना ही तीन प्रमुख कार्ये असतात. दुष्ट व्यक्ती असो किंवा तपस्वी, अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंत अवतार घेतात, असे सांगताना महंत रामगिरीजी महाराज यांनी रामायणातील शंबूकाच्या प्रसंगाचे उदाहरण देत भगवंताच्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट केले.

श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहात भगवद्गीतेचा उपदेश देताना महंत रामगिरी महाराज यांनी जीवनातील चिंता, अध्यात्माची शक्ती, प्रसादाचे महत्त्व, अन्नातील संस्कार तसेच रामायणातील विविध प्रसंगांवर सविस्तर मार्गदर्शन केले. एकरूखे, ममदापूर, विठ्ठलवाडी, हनुमानवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने संतपूजन करण्यात आले. यावेळी जनार्दन स्वामी मठ, कोपरगावचे मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज, खा. भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुजय विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील, कमलाकर कोते, श्रीरामपूरचे सीईओ मनोज उकिर्डे, सचिन गुजर, प्रकाश चित्ते, नीरज मुरकुटे, आशिष धनवटे, मंजुश्री मुरकुटे, ह.भ.प. भगवान महाराज जंगले (शास्त्री) गोणेगावकर, वाल्मीक शिंदे, दिपाली प्रकाश चित्ते अशोक मिसाळ, मधुकर महाराज कडलग, विक्रम महाराज, संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, सद्गुरू उद्योग समूहाचे सर्जेराव मुंढे, राजेंद्र खाजेकर यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी धनगरवाडीतील रस्ते दुरुस्त करण्यासाठी ४ कोटींची मदत दिली आहे असे यावेळी महाराज म्हणाले.पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पा.  डॉ सुजय विखे पा. यांच्या वतीने १०१ पोती साखर श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी देण्यात आल्याची माहिती डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

सात्त्विक अन्नाचे महत्त्व सांगताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, तुम्ही ज्या संस्काराचे अन्नसेवन कराल, तसं मन बनतं, हा अध्यात्माचा सिद्धांत आहे. म्हणून सात्त्विक अन्न का सेवन करायचं, याचा विचार केला पाहिजे.शास्त्रामध्ये मांसाहाराचा निषेध का सांगितला आहे, याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले,शास्त्र सांगतं मांसाहार करू नका. का करू नका? तर त्या जीवाची हत्या केलेली आहे. तो जीव मारलेला आहे. प्रत्येकाला जगावं वाटतं. ज्याला जगावं वाटतं, त्याला तुम्ही ठार मारून खात आहात. कोणाला तरी दुःख देऊन तुम्ही अन्न सेवन करीत असाल, तर तुमच्या रक्तामध्ये ते संस्कार येणार आहेत. म्हणून परमार्थ करणाऱ्यांनी मांसाहार करू नये; कारण संस्कार महत्त्वाचे आहेत. कोणत्या संस्काराचे आपण अन्न सेवन करतो, ते महत्त्वाचे आहे,असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी रामायणावर प्रकाश टाकताना श्रीरामांनी सीतेची अग्निपरीक्षा का घेतली असावी, याबाबत विवेचन केले. ते म्हणाले,श्रीरामांना माहिती होतं की सीता शुद्ध आहे. रावणाने सीतेला पळवून नेलं होतं. मग सीतेची अग्निपरीक्षा का घेतली होती? अग्निपरीक्षा घेऊन स्वीकारलं. परीक्षा घेऊन सीता शुद्ध आहे हे समजलं. पण तरीपण गर्भावस्थेत असताना सीतेला जंगलात सोडून द्यायचं काम केलं. हा स्त्रियांवर अन्याय नाही का? असा एकच प्रश्न आहे.

भगवंताच्या अवताराचे प्रयोजन स्पष्ट करताना महंत रामगिरीजी महाराज म्हणाले, दुष्टांचा नाश, भक्ताचे रक्षण आणि धर्माची संस्थापना या तीन कार्यांसाठी भगवंताचा अवतार असतो. तो दुष्ट असो किंवा तो तपस्वी का असेना, भगवान परमात्मा त्याला ठार करतात. शंबूक दुष्ट होता म्हणून भगवान रामाने शंबूकाला मारले, हे कार्य भगवान रामाचे आहे,असेही त्यांनी सांगितले.

सप्ताहस्थळी भव्य पालकमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला असून याठिकाणी जिल्हा परिषद, प्रवरा मेडिकल, साखर कामगार, पंचायत समिती मार्फत विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे तसेच या ठिकाणी गोदाधाम बेट सरलाच्यावतीने गंगागिरी आयुर्वेद या नावाने आयुर्वेदिक उपचार केंद्र सुरू केले आहे टिळकनगर इंडस्ट्रीज तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले असून या ठिकाणी रक्तपेढी, रक्तदान शिबिर व व्यसनमुक्ती केंद्र देखील उभारण्यात आले आहे.

सप्ताहस्थळी ये जा करणाऱ्या वाहनांची गर्दी झाली होती  डॉ सुजय विखे पाटील यांनी गाडीच्या खाली उतरून वाहतूक सुरळीत होण्यासाठी बराच वेळ मदत केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!