spot_img
spot_img

दोन मुलांना गळफास देऊन आईची आत्महत्या; देवळाली प्रवरा हादरले ! कारवाडी परिसरातील हृदयद्रावक घटना; आत्महत्येच्या कारणाबाबत पोलिसांचा तपास सुरू

देवळाली प्रवरा(जनता आवाज वृत्तसेवा):- देवळाली प्रवरा येथील कारवाडी परिसरात एका विवाहित महिलेने आपल्या दोन मुलांना गळफास दिल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या घटनेने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

वंदना गणेश गाडे असे मृत महिलेचे नाव असून, जीवन गणेश गाडे (वय ४) आणि चैतन्य गणेश गाडे (वय ६) अशी मृत मुलांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार, वंदना यांनी प्रथम दोन्ही मुलांना गळफास दिला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य हा काही काळ आपल्या आत्याकडे शिक्षणासाठी राहत होता. सोमवारी सकाळी तो आईकडे घरी आला होता. वंदना यांचे पती गणेश जगन्नाथ गाडे हे सेंट्रिंगच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरामध्ये पत्नी वंदना तसेच दोन्ही मुले गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

ही घटना सायंकाळी सहा वाजण्यापूर्वी घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुरीचे पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल गणेश लिपणे, सुरज गायकवाड आणि राहुल यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

दरम्यान, या तिहेरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खासगी सावकाराच्या कथित जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. मात्र, या चर्चेला अद्याप पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण काय, याचा तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

एकाच कुटुंबातील आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्याने कारवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलिस तपासातून या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!