पुणे( जनता आवाज वृत्तसेवा):- शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक चारबाहेर बुधवारी (ता. २५) दुपारी रक्तरंजित थरार घडला. कात्रज येथील हत्याप्रकरणातील आरोपी आणि चार दिवसांपूर्वीच जामिनावर बाहेर आलेल्या मंदार मारुती किवळे याच्यावर सहा ते सात जणांच्या टोळीने गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या किवळेचा मृत्यू झाला.
न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या किवळेवर भरदिवसा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
दोन दुचाकींवरून आले अन् केला हल्ला
पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, कात्रज येथील संतोषनगरमध्ये २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या शुभम सुभाष चव्हाण हत्याप्रकरणात मंदार किवळे आरोपी होता. तो काही दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता.
बुधवारी सुनावणीसाठी तो शिवाजीनगर न्यायालयात आला असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. दोन दुचाकींवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम त्याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याचा पाठलाग करत कोयत्याने वार केले.
मदतीसाठी पोलिसांकडे धावला
हल्ल्यात गंभीर जखमी झालेला किवळे स्वतः मदतीसाठी पोलिसांच्या दिशेने गेला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
हल्लेखोरांनी घटनास्थळी शस्त्र टाकून दुचाकींवरून पलायन केले. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.
न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दोन दिवसांपूर्वीच पुणे न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. त्यानंतर न्यायालय परिसरातच शस्त्र घेऊन हल्लेखोर पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी गृहखात्यावर टीका करत कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे.
दरम्यान, हल्ल्यामागील कारण, आरोपींची भूमिका आणि या कटातील इतर सहभागींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.




Total Users : 686993