spot_img
spot_img

प्रवरा पब्लिक स्कूलचा ५८ वा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न…!

लोणी (जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा पब्लिक स्कूलचा ५८ वा वार्षिक क्रीडा महोत्सव दि.१९ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत अतिशय जल्लोषात संपन्न झाला. हा क्रीडा महोत्सव चार सदनांमधून व चार गटात आयोजित केला होता. त्यामध्ये सरदार पटेल सदनाने प्रथम क्रमांक मिळवून वार्षिक क्रीडा करंडक पटकावला,तर शिवाजी सदन उपविजेते राहिले.अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.

दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.या पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलन करून झाली.शाळेचे प्राचार्य डॉ.बी बी अंबाडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्या प्रास्ताविकातून करून दिला.पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा पब्लिक स्कूलचे माजी विद्यार्थी श्री. संतोषजी शिंदे (उपाध्यक्ष, आदित्य बिर्ला कॅपिटल मुंबई) हे सपत्नीक उपस्थित होते. त्यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शालेय आठवणींना उजाळा दिला.तसेच जीवनात संकटांना जिद्दीने सामोरे जा व प्रत्येक क्षेत्रात संधी शोधा,असा मूलमंत्र ही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.तीन दिवस चाललेल्या या वार्षिक क्रीडा महोत्सवात १००,२००,४०० मीटर ४०० बाय ४ रिले अशा धावण्याच्या शर्यती,तसेच उंच उडी, लांब उडी,तिहेरी उडी,गोळा फेक, थाळी फेक,भाला फेक,अशा विविध मैदानी खेळांचा समावेश होता. तर प्राथमिक विभागाच्या विविध मनोरंजनात्मक खेळांच्या स्पर्धा पार पडल्या.चार सदन व चार गट अशा स्वरूपात हा क्रीडा महोत्सव पार पडला.या क्रीडा महोत्सवात सरदार पटेल सदनाने २३४ सर्वोच्च गुणांसह वार्षिक क्रीडा करंडक पटकावला,तर शिवाजी सदन २०७ गुणांसह द्वितीय स्थानी राहिले. तृतीय क्रमांक तानाजी सदन व चतुर्थ क्रमांक नेताजी साधनास मिळाला.या क्रीडा महोत्सवात १२ वर्ष वयोगटात ओंकार कामडी,१४ वर्षे वयोगटात ओमराज घाडगे व कु.वैभवी आहेर,१७ वर्ष वयोगटात प्रतिक वसावे व अनुष्का म्हस्के,तर १९ वर्षे वयोगटात रोहिदास चव्हाण यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावले.तर बहुमानाचा समजला जाणारा वार्षिक सर्वोत्तम क्रीडापटूचा पुरस्कार मुले गटात प्रथमेश भोसले व मुली गटात कु.पायल खर्डे यांना मिळाला. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व सुवर्णपदक,रौप्यपदक व कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले.शेवटच्या दिवशी शिक्षकांच्याही १०० मीटर धावण्याच्या शर्यती पार पडल्या. हे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

सर्व विजेत्या स्पर्धकांचे व सदनाचे संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील,सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी विशेष अभिनंदन केले.

याप्रसंगी शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे,उपप्राचार्य श्री. के टी अडसूळ,पर्यवेक्षिका सौ. एम.एस जगधने व सौ. शुभांगी रत्नपारखी उपस्थित होते स्पर्धेत स्पर्धेच्या शाळेचे क्रीडा संचालक श्री.डी के जाधव व श्री.अफजल पटेल यांनी स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.तर संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन सौ.एस.आर क्षीरसागर व श्री.एस.डी ढगे यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!