spot_img
spot_img

तालुक्यातील लोकांना विकास हवा तुमची दहशत नको – महसूल मंत्री विखे पाटील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी कोणाच्या नावावर केल्या? वडगाव पान येथे ४१ कोटी पाणीपुरवठा योजनेचे व छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन

संगमनेर, दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-वर्षानुवर्षे जनतेला पिण्‍याचे पाणी देवू न शकलेले नेते स्‍वत:ला जलनायक म्‍हणून मिरवून घेण्यात धन्यता मानतात,निळवंडेचे श्रेय जरूर घ्‍या पण प्रकल्‍पग्रस्‍तांना दिलेल्‍या जमिनी कोणी कोणाच्‍या नावावर केल्‍या हे सांगायला विसरू नका. विकासाच्‍या पोकळ गप्‍पा मारणा-यांनी माफीयांच्‍या माध्‍यमातून फक्त दहशत निर्माण केली.कोणत्याही धाक दडपशाहीला घाबरू नका मी तुमच्या पाठीशी उभा आहे,तालुक्यातील सामान्य माणसाला विकास हवा आहे,तुमची दहशत आता नको असे सडेतोड प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

वडगावपान येथे सुमारे ४१ कोटी रुपयांच्‍या पाणी पुरवठा योजनेचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या स्‍मारकाचे भूमिपुजन मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. गजानन बाबा गडगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्‍न झालेल्‍या या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक भगवंतराव मोरे, बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ, तालुका अध्‍यक्ष सतिष कानवडे, डॉ.अशोक इथापे, अमोल खताळ, निळवंडेचे सरपंच सौ.शशिकला पवार, रहिमपुरच्‍या सरपंच सौ. सविता शिंदे, कोल्‍हेवाडीच्‍या सरपंच सुवर्णा दिघे, सरपंच श्रीनाथ थोरात यांच्‍यासह मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात मंत्री विखे पाटील यांनी वर्षानुवर्षे सत्‍ता असूनही गावांना पिण्‍याचे पाणी मिळाले नाही. अशा गावांसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्‍येक घराला नळाव्‍दारे पाणी देण्‍याचे धोरण घेतले आहे. वडगावपानची ३ कोटी रुपयांची योजना आता ४१ कोटी रुपयांची मंजुर करण्‍यात आली असून, गावासाठी हे ऐतिहासिक काम होत आहे. यापुर्वी फक्‍त तुम्‍हाला आश्‍वासनं मिळाली होती. अनेक गावांमध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍याचा प्रश्‍न बिकट आहे तरीही नेते स्‍वत:ला जलनायक म्‍हणून मिरवून घेतत याचे आश्‍चर्य वाटते.

तालुका दुष्‍काळाचे मॉडेल म्‍हणून पुढे आणण्‍यात त्‍यांना धन्‍यता वाटते. तालुक्‍यात रोजगाराच्‍या कोणत्‍याही संधी नाहीत. केवळ माफीयांना पुढे करुन, आजपर्यंत राजकारण झाले. परंतू या माफीयांची दहशतही आता बंद झाली आहे. त्‍या अस्‍वस्‍थतेतूनच काहीजण सैरभैर झाले आहेत. सता गेल्याचे वैफल्य त्यांना आहे. तालुक्‍यातील ही दहशतच संपविण्यासाठी सामान्य माणूस विकासाला साथ देण्यासाठी गावागावातून पुढे येत आहे. त्‍याची सुरुवातच वडगावपान पासून झाली असून,अनेक गावांमधील युवक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्‍ये प्रवेश करीत आहेत. कोणाच्‍याही दडपणाला बळी पडू नका, मी तुमच्‍या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्‍वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

तालुक्‍यात आज रोजगाराचे कुठलेही साधन नाही. त्‍यामुळेच जिल्‍ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचा आराखडा आपण तयार केला असून, नगर आणि शिर्डी येथे नव्‍या औद्योगिक वसाहतींसाठी जागेची उपलब्‍धता करुन, दिली आहे. याठिकाणी आता नवीन उद्योग येणार असून, पुढील एक ते दिड वर्षात येणा-या कंपन्‍यांच्‍या माध्‍यमातून युवकांना नोक-यांची संधी उपलब्‍ध होईल असे स्‍पष्‍ट करुन मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून सामान्‍य माणसांसाठी योजनांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.

मागील अडीच वर्षांचा आघाडी सरकारचा कार्यकाळ आपण पाहीला. कोव्‍हीड संकटात कोणतीही मदत आघाडी सरकारने केली नाही. केंद्र सरकारने मात्र सुरु केलेली मोफत धान्‍य योजना आजही सुरु आहे. या योजनेचा मोठा दिलासा जनतेला मिळत आहे. राज्‍य सरकारनेही एक रुपयात पिकविमा योजना सुरु करुन, शेतक-यांना संरक्षण कवच देण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. नमो महाकिसान सन्‍मान योजनेच्‍या माध्‍यमातून दरवर्षी आता ६ हजार रुपये देण्‍याची योजना सुरु केली आहे. महसूल विभागाच्‍या माध्‍यमातून ग्रामीण भागातील रस्‍ते अतिक्रमणमुक्‍त करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

वडगावपानचे सरपंच श्रीनाथ थोरात याप्रसंगी बोलताना म्‍हणाले की, ४० वर्षे गावाच्‍या ओढ्याला पाणी होते पण पि‍ण्‍यास पाणी नव्‍हते. मत्री विखे पाटील यांच्‍या माध्‍यमातून पिण्‍याचा मोठा प्रश्‍न मार्गी लागत आहे. गावामध्‍ये केवळ त्रास देण्‍याचे काम झाले. परंतू आता गावातील वातावरण बदलत असून, त्‍याचा परिणाम म्‍हणजे आजचा कार्यक्रम आहे. कार्यक्रम होवू नये म्‍हणून प्रयत्‍न करणा-यांनाही अपयश आल्‍याचा टोला त्‍यांनी लगावला. सेवानिवृत्‍त पोलिस आधिकारी भगवंतराव मोरे म्‍हणाले की, ग्रामपंचायतीच्‍या माध्यमातून विकसीत होत असलेल्‍या व्यापारी संकुलाला दत्‍ताजी मोरे यांचे नाव देण्‍याच्‍या निर्णयाने आनंद झाला असल्‍याचे सांगितले.

निळवंडेचे सरपंच आभाळे यांनी प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या नो‍करीसाठी मंत्री विखे पाटील केलेल्‍या सहकार्याचा उल्‍लेख करुन प्रकल्‍पग्रस्‍तांना त्‍यांच्‍या संस्‍थामध्‍ये नोकरीच्‍या संधी दिल्‍या असल्‍याचे सांगितले. या विषयाच्‍या अनुषंगाने मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, या तालुक्‍यात तर प्रकल्‍पग्रस्‍तांना दिलेल्‍या जमीनी कोणी कोणाच्‍या नावावर केल्‍या हे जनतेला माहीती असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!