कोल्हार (जनता आज वृत्तसेवा):- कोल्हार बु. येथे आषाढी एकादशीच्या दिवशी विठुराया आणि आषाढीचे महत्व कोल्हार परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांना समजावे या उद्देशाने गुरुवारी विविध शाळांमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. गुरुकुल संपदा स्कूलच्या प्रांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय सोहळा साजरा करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात ह .भ. प. संदीप महाराज चेचरे यांच्या प्रवचनाने करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक सुधीर आहेर व सौ.सारिका सुधीर आहेर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन , पालखी पूजन ,व विठ्ठलाची आरती झाली. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विठ्ठल भक्त गोरा कुंभार यांच्या हुबेहूब कथेचे सादरीकरण केले. विठ्ठल रखुमाई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातील विद्यार्थ्यांनी शालेय प्रांगणात काढलेली दिंडी आणि माऊली माऊलीचा जयघोष यामुळे चैतन्य अवतरले होते .हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते .या सोहळ्याची सांगता सर्व चिमुकल्या वारकऱ्यांसोबत पावली खेळून करण्यात आली.




Total Users : 625396