मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):- सत्ताधाऱ्यांना लाडकी बहीण नाही तर लाडकी सत्ता हवी आहे. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी चाललेली ही केविलवाणी धडपड असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. मात्र, जनता हे सगळे ओळखून आहे. लोकांनी सगळे अनुभवले आहे. त्याचा एवढा ठसा उमटलेला आहे की, आता गुलाबी करून काहीही होईल असे वाटत नसल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेवर केली आहे.
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत सर्वत्र गुलाबी रंग दिसत आहे. यावरून बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांना चांगलेच सुनावले. रंग गुलाबी करून काय उपयोग आहे? लोकांनी सगळे तुमचे अनुभवलेले आहे. त्याचा असा ठसा उमटला की आता गुलाबी करून काही होणार नाही, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
नाशिक ते मुंबई हा प्रवास तीन तासांमध्ये आपण करत होतो. मात्र आता त्याच प्रवासाला पाच ते सहा तास लागत आहेत. कधी कधी एकाच जागेवर पाच पाच तास लागत आहेत. या रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक एवढी झाली की, इतकी वाईट परिस्थिती आजपर्यंत आम्ही पाहिली नव्हती.
सरकारचे नागरिकांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचा आरोप आ. थोरात यांनी केला आहे. त्यांना केवळ मतांचे पडले असून ते सत्तेचे गुंतलेले असल्याची टीका देखील त्यांनी केली. 31 मार्चपर्यंत हा रस्ता पूर्णपणे चांगला करू, असे आश्वासन दिले होते. मात्र यांचे शासनावर आणि प्रशासनावर नियंत्रण नाही. याचा पाठपुरावा झाला नाही. त्यामुळे नाशिक आणि मुंबईतील जनतेची प्रचंड नाराजी असल्याचा दावा देखील आ. थोरात यांनी केला आहे.




Total Users : 611639